लाखो धारकर्‍यांनी वाई-जावलीचे खोरे पुलकीत


वाई : संभाजीराव भिडे गुरुजी यांनी स्थापन केलेल्या श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आयोजित धारतीर्थ यात्रेचा दि. 30 रोजी सकाळी 8 वाजता जांभळी, ता. वाई येथे समारोप होणार आहे. दरम्यान या गडकोट मोहिमेने वाई -जावलीचे खोरे पुलकीत झाले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रत्येक वर्षी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमांचे आयोजन करत असते. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाने या मोहिमा पार पडत असतात. यावर्षी प्रतापगड ते रायरेश्वर मोहीम आयोजित करण्यात आली होती, दि. 26 जानेवारी रोजी आई भवानी देवीच्या आरतीने प्रतापगड येथून या वर्षीच्या मोहिमेचा प्रारंभ झाला. सर्वात पुढे टेहेळणी पथक, मग भगवा घेतलेला मानकरी, त्यांच्याबरोबर शस्त्रपथक, आणि मागे स्फूर्तीगीते, महाराजांचा जयघोष करत जाणार्‍या धारकर्‍यांचा जमाव, असे मोहिमेचे स्वरूप होते.

या मोहिमेसाठी राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातून धारकरी सहभागी झाले आहेत. पहिला मुक्काम प्रतापगड पायथा येथे असणार्‍या पार गावात पडला. रात्री इतिहासकार पांडुरंगराव बलकवडे यांचे व्याख्यान झाले. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे मोहिमेची सुरुवात झाली. गुरुजींच्या बरोबर सूर्य नमस्कार, जोर बैठका हा व्यायाम झाल्यावर महाबळेश्वरचा भला मोठा डोंगर चढायला मोहीम सरसावली. शिस्तबद्ध तरुण डोंगर चढून क्षेत्र महाबळेश्वर येथे मुक्कामी पोहोचले. येथे इतिहासकार सु.ग.शेवडे यांचे व्याख्यान झाले.

सोमवारी कमळगडमार्गे मोहीम श्री रायरेश्वर येथे पोहोचली. मोहिमेचा भंडारा वाटेत वासोळे येथे संपन्न झाला. यावर्षीच्या समारोपाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जांभळी येथील समारंभासाठी 2 पोलीस उपविभागीय अधिकारी, 5 पोलीस निरीक्षक, 21 पोलीस उपनिरीक्षक, 350 पोलीस, 80 होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुवर्ण सिंहासनाचा संकल्प

32 मण सुवर्ण सिंहासन संकल्प श्री शिवप्रतिष्ठानच्या रायगड येथील कार्यक्रमात मागील वर्षी करण्यात आला.त्यानंतर स्वराज्याची शपथ जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली त्या रायरेश्वराच्या आशिर्वादाला उभ्या हिंदुस्थानातून धारकरी आले आहेत. गुरुजी म्हणाले, आधी कळस मग पाया, अशी आपल्यात म्हण आहे. रायगडावर संकल्प केलेले सिंहासन पूर्ण होण्यास रायरेश्वराचा आशिर्वाद मिळावा, स्वराज्याचे सिंहासन पुनरपी रायगडावर स्थापन व्हावे, हिच यावर्षीच्या मोहिमेतील प्रत्येक धारकर्‍याच्या मनातील इच्छा आहे.

No comments

Powered by Blogger.