मुलींच्या उपस्थिती भत्त्यामध्ये गैरव्यवहार


सातारा : मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून शासनामार्फत उपस्थिती भत्ता योजना बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये या भत्त्यांच्या वाटपात गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. अनेक पालकही उपस्थिती भत्त्याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे या रकमेची शाळा व संस्था चालकांकडून लाटालाटी झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यात उपस्थिती भत्त्याची रक्‍कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबवून तसे प्रयत्नही केले जात आहेत. असे असताना दुसरीकडे शैक्षणिक जगतात काही उणिवा असल्याचे दिसून येत आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे, यासाठी शासन उपस्थिती भत्ता देत असते. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती व विमुक्त जाती वर्गातील मुली त्याचप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थिनीसाठी ही योजना राबवण्यात येत होती. महिन्याला किमान 75 टक्के हजेरी असणार्‍या विद्यार्थिनींना प्रत्येक दिवशी 1 रूपया भत्ता देण्यात येत होता. या योजनेबाबत पालकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे शाळांकडे या भत्याची विचारणाच केली जात नव्हती. त्यामुळे अनेक ठिकाणी ही योजना कागदावरच राहिली होती तर बहुतांश ठिकाणी विद्यार्थिनींची हजेरी दाखवून संस्थांनीच उपस्थिती भत्ता लाटल्याच्या घटनाही घडल्या आहेत.तसेच भत्याच्या वाटपात गैरव्यवहार झाले असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. सातारा जिल्ह्यात असे प्रकार घडले असून शिक्षण विभागाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने विद्यार्थिनींचे बँक खाते काढून त्यांच्या खात्यावरच थेट पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांच्या गैरव्यवहाराला आळा बसला आहे.प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्वसाधारण घटकातील विद्यार्थिंनींना डिसेंबरअखेरचा उपस्थिती भत्ता त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तालुकानिहाय विद्यार्थिनींची संख्या व उपस्थिती भत्ता याप्रमाणे - सातारा 103 विद्यार्थिंनींना 20 हजार 949 रुपये, कराड 416 जणांना 84 हजार 648, पाटण 153 जणांना 32 हजार 790, जावली 58 जणांना 7 हजार 976 , कोरेगाव 98 जणांना 19 हजार41, खटाव 122 जणांना 16 हजार 414, माण 237 जणांना 49 हजार 288, फलटण 204 जणांना 44 हजार 173, वाई 72 जणांना 13 हजार 379 , खंडाळा 56 जणांना 9 हजार 997 रुपये असे मिळून 1519 विद्यार्थिंनींना 2 लाख 98 हजार 655 रुपये उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे. समाजकल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेमधील विद्यार्थिनींनाही उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे.

खरंच निधी वर्ग होतो का?

हजर दिवसाची माहिती महिन्याला शासनाला कळविण्यात येते. त्यानंतर शासनाकडून हा निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त होतो. त्यानंतर हा निधी ट्रेझरीमार्फत त्या त्या तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांच्या खात्यांवर जमा केला जातो व त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या खात्यांवर उपस्थिती भत्त्याची रक्‍कम जमा केली जात असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले. विद्यार्थिनींच्या खात्यांवर हा निधी कितपत वर्ग होतो, याबाबतही पालकांनी शंका उपस्थित केल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.