अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकप्रकरणी आता मोक्‍का


सातारा : जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍या व्यक्‍तींवर मोक्‍का, एमपीडीएसह इतर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येऊन गतिमान व प्रतिबंधात्मक कठोर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली. दरम्यान, या उपाययोजनांमुळे वाळू उत्खनन व वाहतुकीलाही चाप बसणार आहे.

सातारा जिल्ह्यात महसूल व पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेली दक्षता पथके तयार करण्यात आली असून तालुका व उपविभागीय स्तरावर 6 ते 11 दक्षता पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाचे नियंत्रण रोहयो उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. याशिवाय जिल्हास्तरावर 2 दक्षता पथके तसेच सांगली-सातारा जिल्ह्यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे महसूल व पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी असलेले एक संयुक्त दक्षता पथक तयार करण्यात आले आहे.

अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी ही पथके 24 तास कार्यरत राहणार आहेत. ज्याठिकाणी रात्री-अपरात्री वाळू चोरी होते, अशी ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आता शक्य होणार आहे. अशा ठिकाणी जाणारे रस्ते चर काढून वाहतुकीस बंद केले आहेत. इतर ठिकाणी अशी बाब होत असेल तर अशा ठिकाणचे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने चर काढून वाहतुकीस जाण्या-येण्यास कायमचे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सुधारित वाळू, रेती निर्गती धोरणानुसार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हास्तरावर दक्षता समित्याचे गठण करण्यात आले असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी तर तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याशिवाय ज्या गावात वाळू साठे असतील, अशा गावात सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामदक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहेत. दरमहा बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून ग्रामदक्षता समितीने दर पंधरा दिवसांनी एक बैठक आयोजित करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाळू परवाना सहा महिने निलंबित होणार...

जिल्ह्यात एप्रिल 2017 पासून आजअखेर गौणखनिज उत्खननामध्ये 64 प्रकरणी 421.59 लक्ष व अवैध गौणखनिज वाहतूकप्रकरणी 659 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 335.02 लक्ष दंडाची कारवाई केली आहे. विविध कलामाखाली 28 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा वाहनांचा परवाना किमान एक वर्षासाठी निलंबित करण्यात येणार आहे. तसेच वाळू वाहतुकीसाठी वापरलेली साधने जप्त केल्यानंतर त्याच्या मालकाकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येणार आहे. अशी वाहने पुन्हा वाहतुकीसाठी वापरण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास बंधपत्र रद्द करुन त्याची रक्कम शासन जमा करण्यासह वाहनांचा परवाना किमान 6 महिने निलंबित करण्यात येणार आहे.

No comments

Powered by Blogger.