कराडजवळ महामार्गावर घसरगुंडी


कराड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत नटराज चित्रपटगृहासमोर मळी सांडल्याने 16 हून अधिक वाहने घसरली. या अपघातात दुचाकीस्वारांसह अनेक वाहनधारक जखमी झाले. दरम्यान, अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील वाहतूक काही काळ सेवा रस्त्यावरून वळवून रस्त्यावर सांडलेली मळी अग्‍निशमन दलाची गाडी बोलावून पाण्याने धुवून काढली. त्यानंतर सुमारे दीड तासाने महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून दुपारच्या सुमारास मळी घेऊन ट्रक निघाला होता. दरम्यान, मलकापूर गावच्या हद्दीत आल्यानंतर ट्रकचा फळका निसटल्याने मळी महामार्गावर सांडली. त्यामुळे ट्रकच्या पाठीमागून येणारी वाहने मळीवरून घसरून अपघात होऊ लागले. ही अपघातांच्या मालिका सुमारे दहा ते पंधरा मिनिटे सुरु होती. यादरम्यान 16 हून अधिक वाहने घसरून अपघात झाला.

याची माहिती मिळताच वाहतुक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांर्भीय ओळखून महामार्गावरील वाहतुक सेवा रस्त्यावरून वळवली. तोपर्यंत एकापाठोपाठ एक वाहने मळीवरून घसरून चालकाचा ताबा सुटून इकडे तिकडे जात होती. दुचाकीस्वार घसरून रस्त्यावर आपटत होते. यामध्ये एका महिलेसह लहान मूल दुचाकीवरून घसरल्याने जखमी झाले होते. वाहन घसरून पडल्याने अनेकजण किरकोळ जखमी झाले.

दरम्यान, पोलिसांनी कृष्णा रूग्णालयाची अग्निशमनदलाची गाडी बोलवून मळी सांडलेल्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारून रस्ता धुवून काढला. सुमारे दीड तासानंतर महामार्गवरून पुन्हा वाहतूक सुरू झाली.

No comments

Powered by Blogger.