कराडात वाहतूक पोलिसाला दमदाटी


कराड : नो पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकी वाहनाला जॅमर लावल्याच्या कारणावरून वाहतुक शाखेच्या पोलिसाला दमदाटी केली. पैसे न देताच पावती हिसकावून घेतली. तसेच के्रनच्या आडवे झोपून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्त चौक परिसरात रविवार दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सहाय्यक पोलिस फौजदार अनिल वसंत माने यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनिल माने हे शहर पोलिस ठाण्यात वाहतूक शाखेत सेवा बजावत असून ते रविवारी शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलिस क्रेनवर कर्तव्य बजावत होते. तसेच क्रेन चालक संतोष हणमंत शिवनगी, मदतनीस शंकर चंद्रकांत आचार्य, सागर रमेश पाटील, महादेव रामचंद्र क्षीरसागर, चैतन्य भगवान फडतरे हे ही त्यांच्याबरोबर के्रनवर काम करत होते. दरम्यान, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दत्त चौक परिसरातील खुंटाळे दुकानासमोर नो पार्कींग झोनमध्ये रस्त्यावरच कार उभी होती. त्यामुळे कारजवळ थांबून पोलिसांनी कार चालकाचा शोध घेतला मात्र बराचवेळ तो न आल्याने कारवाईसाठी कारच्या चाकांना जॅमर लावला.

त्यानंतर पोलिस क्रेन प्रितीसंगमाच्या दिशेने गेली. काही वेळानंतर कार मालकांचा पोलिसांना जॅमर लावल्यासंदर्भात फोन आला. साडेसहा वाजता पोलिस क्रेनसह फौजदार अनिल माने कारजवळ आले. त्यावेळी तुम्ही आमच्या कारचा जॅमर तत्काळ काढा असे म्हणत दोघांनी पोलिसांना दमदाटी केली. ‘माझा भाऊ आरटीओ असून दुसरा भाऊ पोलिस उपनिरीक्षक आहे’ असे सांगत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांनी त्या दोघांनाही नो पार्कींगच्या दंडाची पावती भरा असे सांगताच त्यांनी पावती हिसकावून घेतली.

त्यानंतर एकजण पोलिस क्रेनच्या आडवा रस्त्यावरच झोपला. वाहतूक पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा गोंधळ सुरूच होता. अंगावर गाडी घाला पण मी पैसे देणार नाही, असे ती व्यक्ती पोलिसांना म्हणत ओरडत होती. दरम्यान, हा प्रकार वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना समजताच त्यांनी दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार सोमवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.