‘कोयना, चांदोली’त आजपासून व्याघ्र गणना


सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना व चांदोली अभयारण्य व सह्याद्री वनक्षेत्रात राष्ट्रीय व्याघ्र गणना 20 ते 25 जानेवारीदरम्यान वनविभाग व वन्यजीव विभागातील कर्मचार्‍यांच्या साहाय्याने करण्यात येणार आहे.

चौथ्या राष्ट्रीय व्याघ्र गणनेत वाघांच्या अधिवास क्षेत्रापेक्षा संरक्षित क्षेत्रावर अधिक भर देण्याचे धोरण यावेळी ठेवण्यात आले आहे. तसेच गणना अंतराची व्याप्ती दोनऐवजी अडीच चौरस किलोमीटर करण्यात आली आहे. देशात सर्वत्र एकाचवेळी ही गणना होत असल्याने जीपीएस यंत्रणेचा अधिकाधिक उपयोग करीत समन्वय साधण्याचा प्रयत्न होणार आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून दर 4 वर्षातून वनविभाग व वन्यजीव विभागामार्फत ही गणना करण्यात येते. यापूर्वी सन 2010, सन 2014 ला व्याघ्र गणना झाली होती. आता सन 2018 मध्ये 20 ते 25 जानेवारीदरम्यान राष्ट्रीय व्याघ्र गणना होत आहे. महाराष्ट्रासह देशभरात दोन टप्प्यात गणना केली जाणार आहे. प्राण्यांचा अधिवास असलेल्या मर्यादित जागांवर कॅमेरे ट्रॅपिंग लावून गणनेचे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्यात ट्रॅपिंग कॅमेर्‍यांचा वापर केला जाणार आहे. या कॅमेर्‍यात टिपल्या जाणाच्या वाघाच्या छायाचित्रातून आकडेवारी निश्‍चित होणार आहे.

या गणनेत केवळ वाघांचीच मोजणी होत नाही तर तृणभक्षी, प्राणी, पक्षी, झाडे झुडपे, खोड व तत्सम सर्वांची गणना केली जाते. पहिल्या टप्प्यात मांसभक्षी प्राण्यांची गणना होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात पाच दिवस गणना केली जाणार आहे. यात वाघांच्या पायाचे ठसे, झालेल्या शिकारीचा प्रकार, विष्ठा यांचा अभ्यास करून आकडेवारी संकलीत करण्यात येणार आहे. ठरलेल्या क्षेत्रात 3 ते 5 वेळा शोधमोहिम घेण्यात येणार आहे. वाघ व अन्य मांसाहारी प्राणी तसेच मोठ्या शाकाहारी प्राण्यांची नोंद घेताना कर्मचार्‍यांवर 15 किलोमीटरची वाटचाल करण्याचे बंधन आहे. शिकारी प्राण्यांनी गत तीन महिन्यात पाळीव जनावरांची हत्या केली असल्यास त्याची स्वतंत्र नोंद घेतली जाणार आहे. दोन प्राणी समुहातील अंतर 20 मीटरपेक्षा अधिक असेल तर अशा समूहाची स्वतंत्र वर्गवारी केली जाणार आहे.

यासाठी वन्यजीव विभागामार्फत अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यापूर्वीच्या तीन व्याघ्रगणनात संरक्षित क्षेत्रातील निरीक्षण दुय्यम होते. मात्र वाघांचा वावर संरक्षित (बफरझोन) क्षेत्रात अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. गणना करताना यापूर्वी अधिवास क्षेत्रावर भर दिला जात होता आता त्यामध्ये नव्याने बदल करण्यात आला आहे. रेखांकित छेदरेषा (ट्रान्झिट लाईन) आता अडीच किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

वाघांची गणना करताना विविध पुराव्याच्या अचुकतेवर भर देण्यात येणार आहे. पाऊलखुणा, जुनी सुकलेली व ताजी विष्ठा, केस, हाडे, चमकणारा भाग, ओलसर व तीव्र वासाची विष्ठा अशा नोंदी ठेवतानाच घासण्याच्या खुणा, झाडाच्या खोडावरील दंतव्रण, ओरखडण्याची चिन्हे, प्रत्यक्ष दर्शन, आरोळी, भुंकणे व अन्य आवाज टिपले जाणार आहेत.

No comments

Powered by Blogger.