सातार्‍यात गुलमोहर कॉलनीत चोरट्यांचा धुडगूस


सातारा : सातार्‍यात चोरट्यांचा अक्षरश: धुडगूस सुरुच आहे. सदरबझार येथील गुलमोहर कॉलनीमध्ये आठ दिवसांत तब्बल आठ घरे फोडून चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे. या घटनेनंतर चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी महिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून कैफियत मांडली. दरम्यान, चोरट्यांनी टीव्ही, कॅमेरा, मोबाईल, रोकड असा ऐवज चोरुन नेल्याने परिसर हादरला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सदरबझार येथे गुलमोहर कॉलनी असून मंगळवारी पहाटे प्रा. संध्या चौगुले यांच्यासह परिसरातील काही घरे चोरट्यांनी टार्गेट करुन चोरी केली. चोरट्यांनी मध्यरात्री खिडकीतून हात घालून खोली उघडली. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त करुन डीएसएलआर कॅमेरा चोरुन नेला. याव्यतिरीक्त चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. चोरी करत असताना एक चोरटा सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

दरम्यान, चोरट्यांनी दुसर्‍या घराकडे मोर्चा वळवत तेथून टीव्ही, पर्स, मोबाईल चोरी केले. मंगळवारी सकाळी चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. परिसरात ठिकठिकाणी चोर्‍या झाल्याचे समोर आल्यानंतर महिलांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना भेटून घटनेबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी रात्री 2 घरे तर गेल्या आठ दिवसात सुमारे आठ ते दहा घरांमध्ये चोर्‍या झाल्या सातार्‍यात चोरट्यांचा अक्षरश: धुडगूस सुरुच असल्याचे समोर आले आहे.

No comments

Powered by Blogger.