विषप्रयोगामुळे 5 गुरे दगावली
सातारा :अंगापूर तर्फ तारगाव (ता. सातारा) येथे 5 जनावरांवर (गुरे) कणकेतून विषप्रयोग करण्यात आल्याचे समोर आले असून या घटनेने शेतकरी हवालदिल झाला आहे. या दुर्घटनेत पाचही जनावरे दगावल्याने तत्काळ या घटनेचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अंकुश एकनाथ शेडगे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांचा गावाजवळ गोठा असून यात एक म्हैस व इतर जनावरे होती.
दि. 30 रोजी दुपारी चारच्या सुमारास कामे संपवून ते गोठ्यातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेले. त्यावेळी गोठ्यात असणार्या एका म्हशीच्या तोंडातून फेस येत होता, तर ती म्हैस हातपाय झाडत असल्याचे दिसले. यामुळे शेडगे यांनी पशुवैद्यकास बोलावून घेतले. डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर म्हशीला विषबाधा झाल्याचे समोर आले व काही वेळातच म्हशीचा मृत्यू झाला. गोठ्याची पाहणी केली असता गव्हाणीत थायमेट मिसळलेले कणकेचे गोळे पडलेले असल्याचे दिसले.
कणकेच्या गोळ्यातून विष दिले
याच परिसरात असणार्या मंगल कणसे यांच्या दोन गाईंना तसेच विठ्ठल नारायण शेडगे यांच्या एका म्हशीलाही अशाच प्रकारे विष असणारे कणकेचे गोळे घालण्यात आले होते. यानंतर दि. 29 रोजी अनिल दत्तात्रय शेडगे यांच्या म्हशीलाही कणकेच्या गोळ्यातून थायमेट घालण्यात आले होते. या सर्व घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Post a Comment