आयुष्यावर बोलू काही...


टायटल वाचून दचकलात?

पण खरंच आयुष्य म्हणजे काय? एक सुंदर प्रश्‍न आहे. त्याचं उत्तर ही तितकंच सुंदर आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं पण श्‍वास असतो आणि ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त नाव असतं पण श्‍वास नसतो. ‘नाव आणि श्‍वास’ यातलं अंतर म्हणजे आयुष्य आहे. मात्र हे आयुष्य जगताना प्रत्येकाचे अनुभव आणि पध्दती या खूपच वेेगवेगळ्या असतात. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते. ‘वृध्दत्व’ हा कुटुंबाचा आजार नाही तर तो आधार आहे, ही मानसिकता सुंदर जगण्याला जन्म देते. ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पा नातीला विनवणी करतात,“ सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे, उन्हामधल्या म्हातार्‍याला फक्त तुझा हात दे..” ‘मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा’ मानणारी माणसेच खरी आनंददूत असतात. महारोग्यांच्या जखमांवर उपचार करुन त्यांच्यामध्ये चैतन्य जागविणारे बाबा आमटे आनंदबनाची निर्मिती करतात. पंख झडलेली पाखरेसुध्दा चैतन्याचा स्पर्श झाल्याने यशाचे उंच शिखर गाठू शकतात, हेच बाबांनी आनंदाच्या रुपाने सिध्द केले आहे. मरगळलेल्या मनाला गती मिळाली तरच आनंदाची निर्मिती होऊ शकते. म्हणूनच तर ते लिहितात.

“शृंखला पायी असू दे, मी गीत गतीचे गाईन,
दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही,
पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड,
बाहू निर्मितीची मुक्त गंगा,
या इथे मातीत बाहू...”

आपल्या संस्कृतीचा मंत्र आहे ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’. सत्याची कास धरा, शिवाची साधना करा आणि सौंदर्याची निर्मिती करा. परिश्रम आणि परमार्थ यांच्या धाग्याने जीवनाचे वस्त्र विनले तर अवघे जगणे सुंदर होईल, हा संदेश आम्हाला संत गाडगेबाबांनी दिला. बाबा हे कोणत्याच विद्यापीठाचे पदवीधर नव्हते. ते स्वत:च समाजप्रबोधनाचे चालते बोलते लोकविद्यापीठ होते. सृष्टीचे पुस्तक हातात घेऊन मानवी मस्तक ताळयावर आणणारे बाबा हे सुंदरतेचे पुरस्कर्ते होते. दिवसा हातात खराटा घेऊन ते गावाचा परिसर स्वच्छ करायचे तर रात्री दगडांचा टाळ करुन मनाच्या स्वच्छतेसाठी किर्तनाचा, परिश्रमाचा आणि परमार्थाचा. असा सुंदर अनुबंध संतच सिध्द करु शकतात. आज किती तरी आजोबा महालाच्या सावलीत तिरस्काराचे चटके सहन करीत जगणे नावाची जन्मठेप भोगत आहेत.

म्हणूनच सांगतो मित्रांनो ‘आजवर जीवनात आपले ओठ मस्तीत शीळ वाजविण्यासाठी वापरले असतील तर ते जखमेवर फुंकर मारण्यासाठी वापरा’.

“ आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणते पाणी दे, माळावरच्या म्हातार्‍याला फक्त तुझी गाणी दे.” डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटल्याप्रमाणे, वृध्दांना आयुष्याचे ओझे वाहण्यासाठी रटाळ सांत्वनाची गरज नसते तर त्यांना प्रेमळ संवादाची भूक असते.

- मीना शिंदे

No comments

Powered by Blogger.