मायणी तलावातील गाळ उचलणे प्रश्नी शासनाची चोर सोडून संन्याशास फाशी भूमिकामायणी :- खटाव तालुक्यातील मायणी येथे सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन तलाव आहे.या तलावात साठलेला वर्षांनुवर्षांचा गाळ शेतकरी व व्यावसायिक उचलून नेत असतात.मात्र गेल्या दहा पंधरा दिवसांतसून अधिकाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे हा गाळ उचलणे बंद झाले आहे. त्यामुळे शेतकरी व वीट व्यावसायिकांबरोबरच गाळ वाहतूक करणारे वाहन मालक ही आर्थिक अडचणीत सापडले असूनत्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचे गाळ उचलण्याबाबतीत अवलंबिलेले चोर सोडून संन्याशास फाशी हे धोरण मागे घेऊन पूर्वीप्रमाणे गाळ उचलण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी ,वाहन मालक , मजूर व वीट उद्योजकातून होत असून या बाबतीत प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून पूर्वीप्रमाणे गाळ वाहतूक करण्यास परवानगी द्यावी अशा आशयाची मागणी जोर धरु लागली आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे ,मायणी येथे ब्रिटिशकालीन तलाव आहे. या तलावात वर्षानुवर्षे पुराच्या पाण्याबरोबर येणारा गाळ प्रचंड प्रमाणात साठून राहिला आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. वास्तविक हा गाळ शासनाने काढणे अपेक्षित होते. मात्र तसे न घडल्याने आज तलावात फार मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिला आहे .
परिसरातील शेतकरी या तलावातून गाळ उचलून नेऊन आपल्या शेतात टाकत असतात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून पीक चांगले येण्यास फायदा होत असतो. तसेच या परिसरातील वीट व्यावसायिक देखील या तलावातून गाळ उचलून नेत असतात .परिणामी तलावातील गाळ उचलल्याने तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढण्यास निश्चित पणाने मदत होत असते .सदर गाळ ट्रॅक्टर अथवा डंपरच्या सहाय्याने शेतकरी व व्यावसायिक वाहून नेत असतात. या तलावाचे प्रवेशद्वार हे वन विभागाच्या अखत्यारीत आहे .मात्र गेल्या दहा बारा दिवसांपासून हे गेट नंबर एकचे प्रवेशद्वार उघडण्यास वन विभागाचे अधिकारी तयार नाहीत. या तलावातून गाळ उचलण्यासाठी वाहनचालकांना सदर गेट बंद केल्याने मुख्य प्रवेशद्वार गेट नंबर एकपासून सुमारे चार ते पाच किलोमीटर दूर अंतरावरून तलावात प्रवेश करावा लागतो. या ठिकाणी देखील मोठ्या चरी काढत्यामुळे वाहनचालकांना आपले वाहन तलावात कोठून व कसे न्यावयाचे ही समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत आहे .तलावात ज्या जाण्यासाठी चार पाच किलोमीटर जावयाचे व तेव्हढेच परत येण्यामुळे वाहतुकीच्या दरात वाढ करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे . तलावातील गाळ उचलण्यात शासनाचा तोटा काय ?असा प्रश्न आहे.
गेल्या१०_१५ दिवसांपासून गाळ उचलणे बंद असल्याने या व्यवसायावर आधारीत अनेक मजूरांच्या कुंटुबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच वीट उद्योजकांसमोर देखील मोठे संकट उभे राहिले आहे.
मायणीच्या तलावात टेंभू योजनेतून पाणी सोडण्याच्या योजनेस देखील प्रशासनाने मंजूरी दिली असून प्रशासकीय प्रक्रियेनंतर सदर काम देखील सुरु होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत सदर गाळ लवकरात लवकर उचलल्यास तलावातील पाण्याच्या साठवण क्षमतेत जादा वाढ होण्यास त्यामुळे मदतच होणार आहे. याचे भान प्रशासनास नाही काय?कुठल्यातरी एका वाहनातून खाली वाळू वर गाळ असा प्रकार घडला. मात्र सदर प्रकार सर्व गाळ वाहून नेणाऱ्या वाहनात घडत आहे काय ?याचा तपास प्रशासनाने घेणे अपेक्षित होते. मात्र चोर सोडून संन्याशास फाशी देण्याच्या प्रशासनाच्या या कृतीबद्दल शेतकरी, वीट व्यावसायिक, कामगार व जनसामान्यांतून आश्चर्य व्यक्त केले जात असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या बाबतीत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शेतकरी रास्ता रोको आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहेत.

No comments

Powered by Blogger.