दुचाकीवरून पडलेली महिला ट्रकखाली सापडून जागीच ठार


कराड :रस्त्यावरील गतिरोधकामुळे दुचाकीवरून पडलेल्या  महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने ती जागीच ठार झाली.  तर तिचा पती गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कराड - पाटण रस्त्यावर आबईचीवाडी, (ता. कराड) गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 2) रात्री हा अपघात झाला. संगीता चंद्रकांत भोसले (वय 40, रा. तांबवे, ता. कराड) असे ट्रकने चिरडल्याने ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती चंद्रकांत शिवाजी भोसले (वय 45) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 
येथील चंद्रकांत भोसले हे गेली अनेक दिवसांपासून कराडमध्ये वास्तव्यास आहेत. चंद्रकांत भोसले  हे शुक्रवारी दुचाकीवरून पत्नीला घेऊन अडूळ येथे  बहिणीकडे गावच्या यात्रेनिमित्त गेले होती. सध्या गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कराडपासून कोयनानगरपर्यंतच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर ठिकठीकाणी गतीरोधक उभारले आहेत. रात्री उशिरा भोसले दाम्पत्य जेवण आटोपून दुचाकीवरून कराडकडे येत होते.
आबईचीवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर रस्त्यावर उभारलेल्या गतीरोधकावर दुचाकी आदळल्याने दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी कराडहून पाटणकडे निघालेल्या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून संगीता जागीच ठार झाल्या. तर चंद्रकांत गंभीर जखमी झाले. रस्त्यावर अपघात झाल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चंद्रकांत यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवले. अपघाताची नोंद कराड तालुका पोलिसात झाली आहे.

No comments

Powered by Blogger.