साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीद्वारे शुभारंभ


पाटण :-  स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथदिंडीने उत्साहात करण्यात आला. तहसीलदार रामहरी भोसले यांच्या हस्ते या दिंडीची सुरूवात झाली. स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विविध मान्यवर साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचेसह विविध शाळा, महाविद्यालये, बालवाड्यांचे चित्ररथ, विद्यार्थी, साहित्य प्रेमी यांच्यासह या ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तहसीलदार रामहरी भोसले, पाटणच्या नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, पोलीस उप निरीक्षक काळे यांच्या हस्ते याचा नगरपंचायत कार्यालय प्रांगणात शुभारंभ झाला.

यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर संयोजक समितीचे सदस्य पत्रकार ए. व्ही. देशपांडे, गणेशचंद्र पिसाळ,करणसिंह पाटणकर, दादासाहेब कदम, राजेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. फुलराणी बालक मंदीर, कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल, पाटणकर प्राथमिक शाळा, कल्याणी इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद मराठी शाळा यांचेसह विविध शाळा, त्यांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व साहित्य प्रेमी यात सहभागी झाले होते. संमेलनस्थळी दिंडीचे आगमन झाल्यावर संमेलनाध्यक्ष जेष्ठ कवी व लेखक प्रा. वैजनाथ महाजन व आ. शंभुराज देसाई यांच्या हस्ते या दिंडीचे पूजन करण्यात आले. ग्रंथदिंडीमध्ये लहान मुलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक स्टॉल, स्व. उदयसिंह पाटणकर व्यासपीठ व स्वातंत्र्य सैनिक स्व. भडकबाबा पाटणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध श्रेत्रातील मान्यवर व साहित्यिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमनाथ आग्रे, अशोकराव देवकांत यांनी केले

No comments

Powered by Blogger.