औंध ग्रामस्थ व युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी


औंध : 12 जानेवारी रोजी औंधचे कुस्ती मैदान संपवून कुंडल येथील क्रांती क्रीडा संकुलाकडे परत निघालेले पाच पैलवान भीषण अपघातात ठार झाले. या घटनेने अवघा पश्‍चिम महाराष्ट्र हादरून गेला होता. यामुळे पैलवानांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्या कुटुंबियांना सावरणे हे आपले आद्य कर्तव्य समजून औंध येथील समाजसेवी युवक, ग्रामस्थांनी सुमारे एक लाख रुपयांचा निधी पैलवानांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करुन एक सामाजिक बांधिलकी जपली. दि. 12 जानेवारीची शुक्रवारची रात्र व शनिवारची पहाट ही क्रांती क्रीडा संकुलातील पाच पैलवांनासाठी काळ रात्र ठरली. औंध येथील कुस्ती मैदान संपवून व काही मित्रमंडळीकडे जेवण करून कुंडलकडे परत निघालेल्या पैलवानांच्या जीपला वांगी गावानजीक भीषण अपघात झाला यामध्ये शुभम घारगे (सोहोली), विजय शिंदे (रामापूर), आकाश देसाई (काले), सौरभ माने (मालखेड), अविनाश गायकवाड (फुफीरे) व ट्रॅक्स ड्रायव्हरचा जागीच ठार झाले होते.

तरुण व होतकरू पैलवानांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. पैलवानांच्या कुटुंबियांनी सर्वस्व पणाला लावून आपली मुले कुंडल येथे प्रशिक्षणासाठी पाठविली होती.पण, काळाने त्यांचे स्वप्न आणि भविष्य उदध्वस्त केले. रामापूर येथील विजय शिंदे यांच्या कुटुंंबियांना वीस हजार रुपये, काले येथील आकाश देसाई यांच्या कुटुंंबियांना पंचवीस हजार रुपये, मालखेड येथील सौरभ माने यांच्या कुटुंबियांना पंचवीस हजार रुपये, फुफिरे येथील अविनाश गायकवाड यांच्या कुटुंबियांना पंचवीस हजार रुपये त्याठिकाणी जाऊन औंध येथील युवक व ग्रामस्थांनी सुपूर्द केले. दरम्यान आकस्मिक मृत्यू पावलेल्या औंध गावचे कोतवाल मनोज भोकरे यांच्या निराधार पत्नीला पंचवीस हजार रुपयांची मदत करण्यात आली.

No comments

Powered by Blogger.