मिठी मारून रेल्वेखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या


सातारा :- शिवथर ता .सातारा गावच्या हद्दीत रेल्वेखाली प्रेमी युगुलाने एकमेकांना मिठी मारुन आपले जीवन संपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या घटनेने सातार्‍यात खळबळ उडाली आहे. अनिल चव्हाण (वय 28) व पूजा शिंदे (वय 17 दोघे रा.बसापाचीवाडी ता.सातारा) अशी युगुलाची नावे आहेत.याबाबत प्राथमिक माहिती अशी, अनिल व पूजा बुधवार पासून बेपत्ता झाले होते.

गुरुवारी सकाळी अनिल व पूजा दोघेही दुचाकीवरुन शिवथर गावच्या हद्दीतील रेल्वे ट्रॅकवर गेले. दुचाकी बाजूला लावल्यानंतर साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोघेही एकमेकांना मिठी मारुन रेल्वे रुळावर झोपले. याच दरम्यान आलेल्या रेल्वेने दोघांना सुमारे 200 मीटर अंतरापर्यंत फरफटत व चिरडत नेले. या घटनेनंतर परिसरातील रेल्वे ट्रॅकच्या वॉचमनच्या लक्षात आल्यानंतर त्याने या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली.

रेल्वे पोलिस व सातारा तालुका पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर प्रथम दोघांची ओळख पटवण्याचे काम केले. दोघांची ओळख पटल्यानंतर याबाबतची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. प्रेमी युगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले.

धक्कादायक बाब म्हणजे अनिल याचा विवाह झाला असून पूजा दहावीत शिकत होती. दरम्यान, दुपारी उशीरापर्यंत जाबजबाब घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

No comments

Powered by Blogger.