सभापती रामराजेंना आठवलं फर्ग्युसनचं वडाचं झाड


फलटण : फर्ग्युसनमधील क्रिकेटची मॅच, वैशालीच्या कट्ट्यावर जावून खाल्लेला डोसा, शिकवणार्‍या प्राध्यापकांची उडवलेली टर, कॉलेजमधील तरुणांचे केलेले नेतृत्व, वडाच्या झाडाखाली बसून घालवलेले रम्य दिवस अशा आठवणींना उजाळा देत विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर हे फर्ग्युसनच्या प्रांगणात पुन्हा एकदा भावुक झाले. फर्ग्युसन गौरव पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यातील मिश्कील विद्यार्थी पुन्हा एकदा चमकून गेला आणि ‘ते वडाचं झाड का हो तोडलं सर’ असे विचारत रामराजेंनी आठवणींच्या कल्लोळाला पुन्हा एकदा हाक मारली.

निमित्त होते फर्ग्युसन महाविद्यालयाने आयोजित केलेल्या फर्ग्युसन गौरव पुरस्कार सोहळ्याचे. ज्येष्ठ कुलगुरु प्रा. डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते रामराजे ना. निंबाळकर यांना फर्ग्युसन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी यशवंत मेहेंदळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे उपस्थित होते. यावेळी मेजर जनरल माधुरी कानिटकर, अभिनेत्री सुहास जोशी, प्राज इंडस्ट्रीजजचे प्रमोद चौधरी, लेखक अनिल अवचट यांना, तसेच आकांक्षा बुचडे, शिवानी इंगळे यांना फर्ग्युसन अभिमान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

निंबाळकर म्हणाले, फर्ग्युसनने देशाला, राज्याला अनेक नेते दिले. सध्याच्या विधानसभेत सर्वाधिक आमदार फर्ग्युसनचे विद्यार्थी आहेत. आमचे दिवस हॅपी गो लकी’ होते. त्या काळात स्पर्धाही फारशी नव्हती. ते दिवस चांगले होते. मला राजकारणाकडून फारसे काही मिळवायचे नाही. मंत्रिपदापेक्षा मला सभापतीपद चांगले वाटते. कारण सहजरित्या बस खाली, हो बाहेर’ असे म्हणता येते. तो आनंद निराळाच. म्हणूनच मी सभापतीपदावर खूष असल्याचेही रामराजे म्हणाले.

ताकवले म्हणाले, आधुनिकता, प्रगतिशीलता पुण्यातल्या महाविद्यालयांनी आणली. परदेशात जसे नोबेल विजेते होते, तसेच अनेक रँग्लर येथे होते. भविष्याच्या दृष्टीने आपल्याला डिजिटल सोसायटीचाच विचार अधिक करावा लागेल.

पुणेरी खवचटपणा व फलटणचा आचरटपणा

आपल्या भाषणात रामराजे कॉलेजच्या दिवसात चांगलेच रमले. महाविद्यालयीन जीवनातील आठवणी काढताना त्यांना वडाचे झाडही आठवले. ते झाड तुम्ही तोडले खूप वाईट वाटत आहे. असे सांगताना रामराजे कमालीचे मिश्कील झाले. बर्‍याच गोष्टी बोलायच्या आहेत. मात्र, डॉ. ताकवले असताना मी ते बोलू शकत नाही. त्यांना आम्ही देवानंद म्हणायचो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांचीही त्यांनी फिरकी घेतली. यांचे फोटो घरात लावले तर मी आणखी तरुण दिसेल, असेही ते म्हणाले. पुणेरी खवचटपणा व फलटणचा आचरटपणा याचे मी कॉम्बीनेशन आहे आणि या सार्‍याची सुरुवात फर्ग्युसनमध्येच झाली याची कबुलीही रामराजे यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.