आगाशिव मार्ग बनलाय तळीरामांचा अड्डा


कराड :लाखो रूपये खर्च करून निर्माण करण्यात आलेले ऐतिहासिक आगाशिव पर्यटनस्थळ तळीरामांचा अड्डा बनल्याचे दुर्दैवी चित्र आगाशिवनगर (मलकापूर) येथे पहावयास मिळत आहे. दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास अन् कचर्‍याचे साम्राज्य निर्माण झाल्याने व्यायामासाठी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या कार्यालयामागेच हे प्रकार होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पुणे - बंगळूर महामार्गाच्या पश्‍चिमेस कराडपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक आगाशिव डोंगर आहे. या डोंगरावर महादेव मंदिर तसेच सुमारे 300 वर्षापूर्वीच्या बौद्ध लेण्यांसह असून दक्षिण बाजूला 23 तर उत्तर बाजूला 19 लेण्या आहेत. या लेण्या आजही वास्तुशिल्प व ऐतिहासिक कोरीव कामाची साक्ष देतात. चचेगाव परिसरात डोंगर रांगा, जखिणवाडी, आगाशिवनगर, धोंडेवाडी या ठिकाणाहूनही आगाशिव डोंगरावर दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी, पर्यटनासाठी तर काहीजण दररोज व्यायाम करण्यासाठी डोंगरावर जातात.

मलकापूरमधील वनविभागच्या कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस या पायर्‍यांना प्रारंभ होतो. पायर्‍यांच्या प्रारंभीच प्रादेशिक पर्यटन योजना असा फलक आपले स्वागत करतो. शेजारीच मलकापूरच्या पाणी योजनेची टाकी असून हा संपूर्ण परिसर सपाट आहे. त्यामुळे या ठिकाणी दारूंच्या बाटल्या, ग्लास याचा अक्षरश: खच पडलेला दिसतो.

पुढे आपण पायर्‍या चढून वर जातो, तसे दारूच्या बाटल्या आणि ग्लास यांचा काही ठिकाणी झुडपांमध्ये ढीगच लागल्याचे पहावयास मिळते. वनविभागासह जखणाईदेवी वनसरंक्षक समितीचे या सर्व प्रकाराकडे सध्यस्थितीत तरी लक्ष नसल्याचेच पहावयास मिळते. त्यामुळेच हे दुर्दैवी चित्र केव्हा बदलणार? असा संतापजनक प्रश्‍न ज्येष्ठ नागरिक उपस्थित करत आहेत.

पर्यटनस्थळाकडे जाणारा मार्ग तळीरामांचा अड्डा बनला आहे. याकडे वनविभागासह जखिणवाडी ग्रामपंचायत, मलकापूर नगरपंचायतीनेही लक्ष देणे गरजेचे आहे.
- गणेश ननावरे, मलकापूर.

No comments

Powered by Blogger.