स्व.धोंडीराम वाघमारे साहेंबाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर...!- ना.श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर ; माजी आमदार स्व.धोंडीराम वाघमारे लिखित हुंदका काव्यसंग्रहाचे प्रकाशन


बिजवडी - दुष्काळी तालुक्यांना वरदायी ठरणाऱ्या उरमोडी ,जिहे कटापूर व धोम बलकवडी या सिंचन योजनांत महत्वपूर्ण भूमिका बजावलेले माजी आमदार स्व.धोंडीराम वाघमारे साहेब १९९१ साली आमचे मार्गदर्शक होते.माण-खटाव-फलटण या दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न दोन-तीन वर्षात पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांनी केले आहे.

माण - फलटण विधानसभा राखीव मतदारसंघाचे माजी आमदार स्व.धोंडीराम वाघमारे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या ' हुंदका ' या द्वितीय काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते वाशी (नवी मुंबई ) येथे विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गणेश नाईक उपस्थित होते.यावेळी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे ,माजी मंत्री दयानंद म्हस्के ,नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार , संदीप नाईक ,स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील , हेमांगीताई सोनवणे ,प्रकाश गोरे , नगरसेवक राजू शिंदे ,सुदत्त दिवे ,अंकुश सोनवणे ,श्रीमती निर्मला वाघमारे आदी प्रमुख मान्यवर तसेच माण-फलटण मतदारसंघातील जुने सहकारी व कार्यकर्ते आवर्जून स्मृतीदिनास उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत माजी आमदार स्व.धोंडीराम वाघमारे यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहण्यात आली.

ना.रामराजे ना.निंबाळकर म्हणाले , दुष्काळाच्या हुंदक्याने माण,फलटण , खटाव व खंडाळा या चार तालुक्यांची नाळ जोडली गेली होती.या भागात पाणी आणण्यासाठी वाघमारे साहेबांच्यासह आम्ही २२ अपक्ष आमदार एकत्र आलो होतो.त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या सहकार्यातून कृष्णा खोरेची स्थापना झाली.त्यानंतर या सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले.माण व फलटण तालुक्याचे पूर्वीपासूनच वेगळेच नाते होते.१९९० साली वाघमारे साहेब माण-फलटण मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप सहकार्य करत मार्गदर्शन केले.साहेबांच्या घरात मी अनेकदा जेवलोय.त्यांना मानणारी समोर बसलेली जनता हीच त्यांनी कमवलेली खरी संपत्ती असल्याचेही सांगून ते म्हणाले ,नवी मुंबईचे भाग्यविधाते माजी मंत्री गणेश नाईक यांच्याबरोबरच फलटणचे नाईकही वाघमारे साहेबांच्या कुटूंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतील.गणेश नाईक साहेब लोकनेते असून जिथे बसतील तिथे जनता दरबार सुरू होतो.दुष्काळी भागातील जनता याठिकाणी रोजगारासाठी आली असून त्यांच्यासह आमच्या दूग्ध व्यवसायाचेही रक्षणकर्ते नाईक साहेबच असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी मंत्री गणेश नाईक म्हणाले , जनसामान्यांच्या हितासाठी प्रयत्न करत ,निसर्गाशी झुंज देत दुष्काळी भागात पाणी नेण्यासाठी प्रयत्न करणारे धोंडीराम वाघमारे सर्वसामान्यांचे नेते होते.दुष्काळी परिस्थितीचे अवलोकन करताना आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर आनंदाने येणारा हुंदका तर अपेक्षा भंग झाल्यावर दुखाने येणारा हुंदका त्यांनी आपल्या काव्यसंग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.वाघमारेंच्या विचारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण आला असून हे नाईक कुटूंब कायम वाघमारे साहेबांच्या कुटूंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे.त्यांचा मुलगा अभय वाघमारे उत्तम क्रिकेटर असून डी.वाय.पाटील स्टेडीयममध्ये तो प्रशिक्षक आहे.नवी मुंबईत वडीलांचा राजकीय वारसा अभय वाघमारे ला जपायचा असेल तर त्याला संधी देण्याचे काम मी करेन पण त्याला वडीलांच्या कर्मभूमीत वारसा जपायचा असेल तर मात्र रामराजे साहेब तुम्हाला लक्ष घालावे लागेल असेही ते म्हणाले.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले , वाघमारे साहेबांनी जनतेच्या हृदयात आपल्या कार्यातून स्थान निर्माण केले आहे.आपली उपस्थिती हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.तात्या किंगमेकर होते पण त्यांनी मोलाची साथ रामराजें साहेबांनी दिली.वाघमारे साहेबांनी माणची तळमळ ,अपेक्षा कवितांच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.माणमधील अनेक कर्तृत्वान व्यक्ती पाहायला मिळाल्यात. दुष्काळावर मात करण्याची ताकद फक्त माणवासियांच्यातच असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात अभय वाघमारे म्हणाले ,दादा माझे मित्र होते ते आम्हाला सोडून गेले असले तरी मात्र आम्हाला आधार देण्यासाठी दोन नाईक ठेऊन गेलेत.मी आदरणीय गणेश नाईक व रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आधारावर वाटचाल करत आहे.दादांचे मूलमंत्र ,संस्कार व त्यांचे विचार जपण्याचे मी कार्य करत आहे.गणेशजी नाईक व संदीपजी नाईक मला त्यांच्या कुटूंबातीलच मानत असून त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी दादांचे विचार कायम जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.नाईक साहेब व रामराजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दादांचा चतुर्थ स्मृतीदिन त्यांच्या कर्मभूमीत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री दयानंद म्हस्के ,महापौर जयवंत सुतार ,अँड.भास्करराव गुंडगे काका ,बापूराव देवकर ,डी.एस.काळे , दत्तात्रय शेंडे ,कृष्णकांत थोरावडे ,आदीं माण -फलटण विधानसभा मतदारसंघातील लोकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली.

सूत्रसंचालन ....यांनी करून उपस्थितांचे आभार अभय वाघमारे यांना मानले.


No comments

Powered by Blogger.