‘कोयना’ची स्थिती गतवर्षीपेक्षा भक्‍कम


पाटण : उन्हाळा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या हंगामात सिंचन व वीजनिर्मितीसाठी सर्वाधिक पाण्याची गरज असते. चालू हंगामात कोयना धरणात गतवर्षीपेक्षा तब्बल 18 टीएमसी जादा पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या असणार्‍या एकूण 85. 52 टीएमसी पाण्यामुळे या तांत्रिक वर्षासह जूननंतरचा काळही सुखकर होणार आहे.

कोयना धरणातील पाण्याकडे सर्वांचेच लक्ष असते. त्यातही नेमक्या उन्हाळ्यात म्हणजेच फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत एका बाजूला विजेची सर्वाधिक मागणी असते, तर दुसरीकडे सिंचनासाठीही वाढीव मागणी असते. या दुहेरी मागणीचा विचार हा धरणात त्यावेळी उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असतो. बहुतांश वेळा आजवर ऐन उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा विचार लक्षात घेता, नेमक्या विजेच्या सर्वाधिक मागणीच्या काळातच पूर्वेकडे सिंचनासाठीच्या वाढत्या मागणीचा विचार होऊन पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीच्या पाणीसाठ्याला कात्री लावली जाते. त्यामुळे मग त्या काळात काही वीजनिर्मिती प्रकल्प बंदही ठेवण्यात येतात. चालू वर्षीचे चित्र मात्र समाधानकारक आहे. 1 जून ते 31 मे या कालावधीत असणार्‍या तांत्रिक वर्षापैकी आता आठ महिन्यांचा कालावधी संपला, तर उन्हाळ्याचा काळ आता सुरू झाला. वर्षभरासाठी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. आत्तापर्यंत आठ महिन्यांत यापैकी 30.26 टीएमसी पाणीवापर झाला आहे. तर उर्वरित 37.24 टीएमसी पाण्यावर अखंड व सुरळीत वीजनिर्मिती होऊ शकते. सिंचन व टेंभू ताकारी प्रकल्पाच्या वाढत्या मागणीनुसार दोन वर्षांपासून सुमारे 34 टीएमसी पाणी सिंचनासाठी लागते. आत्तापर्यंत यासाठी 10.56 टीएमसी पाणीवापर झाला आहे. त्यामुळे अजूनही 23 टीएमसी पाणी सिंचनासाठी देण्यासाठी कोणतीच अडचण नाही. सध्या धरणात एकूण 85.32 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळातील वीजनिर्मितीचा आरक्षित 37, सिचंनासाठी 23 व मृतसाठा 5 अशा एकूण 65 टीएमसीचा विचार झाल्यानंतरही एक जूनपासून नव्याने सुरू होणार्‍या तांत्रिक वर्षासाठी येथे 20 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहू शकतो.

No comments

Powered by Blogger.