वृक्ष तोडीचा मनमानी निर्णय नगरपालिका प्रशासनाला जाग


कराड : दोन आठवड्यापूर्वी कोल्हापूर नाक्यावरील वृक्ष तोडीचा मनमानी निर्णय अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाली असताना नगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या स्थापनेनंतर तब्बल चार महिन्यांनी आता सोमवार, 5 फेब्रुवारीला या समितीची पहिली बैठक होणार आहे. विशेष म्हणजे या समितीचे सदस्य अ‍ॅड. श्रीकांत घोडके हे राजीनाम्याच्या तयारीत आहेत.
सप्टेंबर 2017 मध्ये पालिका सभागृहात वादळी चर्चा होऊन वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना झाली होती. गदारोळानंतर नगरसेवकांसह सुधीर एकांडे, अ‍ॅड. श्रीकांत घोडके, प्रा. जालिंदर काशिद आणि संग्राम कदम या चौघांसह सात नगरसेवकांचा समावेश असलेली वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्यात आली होती.

18 डिसेंबरला कोल्हापूर नाका परिसरात वृक्ष तोड करण्यात आली. त्यानंतर नगरसेवक सौरभ पाटील, सामाजिक कार्यकर्ते नाना खामकर, पर्यावरण प्रेमी रोहन भाटे, जालिंदर काशिद यांच्यासह रिक्षा चालकांनी सर्व नियम डावलत ही कार्यवाही केल्याबद्दल पालिका अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. त्यानंतर सौरभ पाटील यांनी मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार दाखल करत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. तर नाना खामकर यांनी याप्रश्‍नी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच तक्रार दाखल केली होती. या दोन्ही तक्रारीवर अद्यापही ठोस कार्यवाही झालेली नाही.

विशेष म्हणजे या समितीचे सदस्य असलेले जालिंदर काशिद, अ‍ॅड. श्रीकांत घोडके यांनी यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची एकही अधिकृत बैठक झाली नसल्याचे सांगितले आहे. प्रा. काशिद यांनी यापूर्वीच कोल्हापूर नाक्यावरील वृक्ष तोडीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तर अ‍ॅड. घोडके यांनी या सर्व प्रकारामुळे व्यथित होत या समितीच्या सदस्यपदाचा राजीनामाच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आता सोमवारी होणार्‍या वृक्ष प्राधिकरण समितीकडे कराडवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती ही महत्त्वाची समिती आहे. या समितीवर काम करणे आपणास अशक्य आहे. त्यामुळेच आपण या राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- अ‍ॅड. श्रीकांत घोडके.

माझ्या तक्रारीबाबत पालिकेकडून कानावर हात...

नाना खामकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून माहिती घेतली असता हे प्रकरण नगरपालिकेकडे पाठवण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे खामकर यांनी नगरपालिकेत जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आपणास समाधानकार माहिती मिळाली नसल्याचे नाना खामकर यांनी दै. ‘पुढारी’ बोलताना सांगितले.

No comments

Powered by Blogger.