बिजवडी ग्रामस्थांनी घेतला ग्रा.पं.निवडणूक बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय...!


बिजवडी :- बिजवडी ता.माण येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून सरपंचपदासाठी सर्वानुमते आप्पासो भानुदास अडागळे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. सुरूवातीपासूनच गावची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्थानिक नेतेमंडळी प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या ऐतिहासिक निर्णयाबद्दल प्रशासनातर्फे ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे.
  माण तालुक्यातील राजकीयदृष्टया संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बिजवडी गावात सर्व पक्षांतील पक्षश्रेष्टींनी स्थानिक नेतेमंडळींना महत्वाची पदे दिल्याने सर्वांसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.
 गावची निवडणूक बिनविरोध व्हावी या हेतूने कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम.के.भोसले ,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले ,राष्ट्रवादीचे तुकाराम भोसले ,भाजपाचे युवा अध्यक्ष संदीप भोसले ,रासपचे यशवंत गाढवे यांच्यासह सर्वपक्षिय प्रमुख नेतेमंडळी जनजागृती व मार्गदर्शन करताना दिसून येत होते.
आज सकाळी मारूती मंदीरात सर्वपक्षिय नेतेमंडळी ,प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक झाली त्या बैठकीत गावची निवडणूक बिनविरोध करावी हा विषय घेण्यात आला.याला सर्वानुमते होकार मिळाल्यानंतर सरपंचपदासाठी इच्छुक असलेले आप्पासो भानुदास अडागळे यांचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आले.त्यांना अडीच वर्षे संधी देण्यात येणार असून पुढील अडीच वर्षे दुसऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. या चर्चेत सर्व पक्षांना जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या जागा कोणाला द्यायच्या त्या संबंधित पक्षांनी ठरवायचे असून तेवढेच अर्ज भरण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.या व्यतिरिक्त जर कोणी उमेदवारी अर्ज भरला तर गावाने त्याला विनंती करायची आहे अन्यथा त्याच्याविरोधात गावाने लढायचे ठरवले आहे.
निवडणूका लागल्यानंतर त्यासाठी लागणारा अमाप पैसा ,हेवेदावे ,भांडणतंटे यावर मात करण्यासाठी बिदाल , अनभुलेवाडी बरोबरच अतिसंवेदनशील पळशीसारख्या गावचा आदर्श घेत स्थानिक नेतेमंडळींनी निवडणूक बिनविरोध करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

चौकट - सर्वपक्षिय नेतेमंडळींनी व ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला सरपंचपदाची संधी दिली असून त्या विश्वासाला पात्र ठरत सर्वांना बरोबर घेऊन गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- आप्पासो अडागळे (भावी सरपंच)

फोटो - बिजवडी ता.माण ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णय घेण्यात आला असून सरपंचपदासाठी आप्पा अडागळे यांचे नाव निश्चित केल्यानंतर त्यांच्यासमवेत उपस्थीत स्थानिक नेतेमंडळी व ग्रामस्थ....

No comments

Powered by Blogger.