कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जेलभरो आंदोलन


सातारा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्‍वासित मागण्यांसंदर्भात सातारा जिल्ह्यात शुक्रवारी कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. मात्र, शासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने जोरदार निदर्शने करुन जेलभरो आंदोलन करण्यात आले.

दि. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांसाठीची नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदान तत्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरीत अनुदान द्यावे आदी विविध मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास कुलाळ यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले. आंदोलनात अध्यक्ष सुरेश देसाई, प्रा. बी.बी. पाटील, प्रा. एस.जे. पाटील, माधवराव गुरव, प्रा. आर.एस. शिंदे, प्रा. दत्तात्रय धर्मे व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक सहभागी झाले होते.

No comments

Powered by Blogger.