फलटण तालुक्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विश्वासराव नांगरे पाटील फलटणकडे लक्ष देणार का?


सोमंथळी:-  फलटण तालुक्यातील वाढत्या क्राईम रेटला ब्रेक लावण्यासाठी विश्वासराव नांगरे पाटील यांनीच लक्ष घालण्याची मागणी फलटणकर , नागरिक करताना दिसतात. 
फलटण तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रूळावर येणार का? असा प्रश्न फलटण शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावत आहे. कारण फलटण तालुक्यात राजरोसपणे सुरू असणारे अवैध धंदे ! दारू, जुगार, मटका रोखण्यात फलटण तालुक्यातील पोलीस पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. तसेच वाढती गुन्हेगारी, खून, चोरी, फसवणूक, खाजगी सावकारी यांचेपुढेही फलटण पोलिसांनी पुर्णपणे लोटांगण घातल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा छोटे मोठे गुन्हे दाखल न करता तडजोडीने मिटवले जातात. तरीही गुन्हेगारीचा टक्का सतत वाढतच आहे. ही फलटण करांच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे.
सद् रक्षणाय खल निग्रहणाय हे पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य असले तरी, खल रक्षणाय सद् निग्रहणाय असे त्याचे उलटे आचरण होत असल्याचे आपणास पहावयास मिळत आहे. कोर्ट कचेरीची पायरी चढू नये, ही सामान्य माणसाची भावना म्हणजे खाकी वर्दीचया राक्षसी अवताराची दहशतच आहे. अन्याय होत असेल तर पोलीस ठाण्यात जावे आणि दाद मागावी, अशी सोयच राहिलेली नाही. कारण दाद मागितल्यानंतर न्याय सोडाच, परंतु दुसरेच लचांड पाठीमागे लागते. असा वाईट अनुभव सर्वसामान्यांच्या पाठीशी आहे.
फलटण तालुक्यात राजरोसपणे दारू, जुगार, मटका, गुटखा यांची विक्री सुरू असून सुद्धा पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहेत. कारण पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांपासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पर्यंत सर्वांनीच हप्ते गोळा करण्यासाठी बेकायदेशीर झिरो पोलिसांचा वापर करणेस सुरुवात केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी ही वाढतच चालली आहे. गुन्हेगारीचा टक्का आपणास वाढताना दिसत आहे. एकीकडे ज्यांचे कडून हप्ते मिळतात, त्यांना बसायला खुर्ची दिली जात आहे. तर दुसरीकडे कोणती ना कोणती तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेल्या सामान्य माणसाला धमकावून, शिव्या देवून तास् न तास बाहेर थांबवले जाते, हा प्रकार लोकशाहीस घातक आहे.
खुन, दरोडा, चोरी, फसवणूक, मारामारी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, खाजगी मालमत्तेचे नुकसान, खाजगी सावकारी, अवैध वाळू व्यवसाय इत्यादी सह भाग पाच व भाग सहा च्या गुन्हेगारीचा आलेख, आपणास चढताच दिसेल. यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास न लागल्याने ते गुन्हे कायम तपासावर , असताना सध्या दोन ते अडीच वर्षांत त्यामध्ये भरच पडलेली दिसून येइल. आणि त्यामुळेच आपल्याला गुन्ह्या मध्ये वाढच होताना दिसते. या दोन ते अडीच वर्षांच्या काळात पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारांनी फलटण तालुक्यात येवून गुन्हे केल्याचे आपणास उघडकीस आलेल्या गुन्ह्यांवरून दिसून येते. म्हणजेच गुन्हेगारांवर पोलिसांची असणारी पकड / वचक फलटण तालुक्यात कमी होताना दिसत आहे. आणि त्यामुळेच क्राईम रेट वाढत आहे. कारण पोलीस आरोपी व फिर्यादी, दोन्हीकडून पैसे उकळताना दिसतात. आणिआरोपी गेलेले पैसे वसूल करण्याचे कामाला सुरुवात करतात. आणि त्यामुळेच क्राईम रेट वाढताना दिसतोय!
खाजगी सावकारांनी तर फलटण तालुक्यात कहरच केला आहे. अनेक शेतकऱ्यांचे कायम खुष खरेदी, मुदत खरेदी, गहाण खरेदी करून घेवून अनेक शेतकऱ्यांना, शेतमजुरांना दर महा दर शेकडा पाच रुपयांपासून ते चाळीस रुपयांपर्यंत टक्केवारीने पैसे वसूल केले आहेत. अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन केले आहे. शेतमजुरांना बेघर केले आहे. खाजगी सावकारांचे ञासाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अनेकांनी आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत. पोलीस ठाण्यात खाजगी सावकारांचे बाबतीत तक्रार घेऊन जाणाऱ्यांची , पोलिसांकडून समजूत घातली जाते. व तक्रारदाला परत पाठविले जाते. त्याबदल्यात पोलीस खाजगी सावकारांचे कडून पैसे उकळतात. जरी एखादी तक्रार दाखल करून घेतली, तरी त्याचा तपास केला जात नाही. त्यामुळे खाजगी सावकारांचे मनोधैर्य चांगलेच उंचावते आणि त्यातूनच फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली जाते. असा प्रकार यापूर्वी फलटण शहर पोलीस ठाण्यात घडला होता. त्याचे सविस्तर वृत्तही वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर संबंधीत खाजगी सावकाराला अटक केली. त्यानंतर खाजगी सावकारांचे ञासाला कंटाळलेल्या पिडीतांचे मनोधैर्य ऊंचावले, पिडीतांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खाजगी सावकारकीचे पंधरा ते वीस गुन्हे दाखल आहेत. परंतु गुन्हे दाखल असणाऱ्या खाजगी सावकारांनी आणखी कोणकोणत्या व्यक्तींना व्याजाने पैसे दिले होते. याचा तपास पोलिसांनी केला नाही. यापाठीमागे काय गौडबंगाल आहे हे पोलिसांनाच माहीत! तसेच खाजगी सावकारी संदर्भात अनेक वरिष्ठ अर्ज चौकशी कामी आले होते, परंतु त्याचे काय झाले? गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत? याचे उत्तर सुद्धा पोलिसांनाच माहिती असणार! आणि त्यामुळेच अजूनही खाजगी सावकार पोलिसांच्या नाकावर टिच्चून खाजगी सावकारकीचा व्यवसाय करताना दिसतात. खाजगी सावकारांचे ञासाने अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. काहींनी जीवनयात्रा संपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत , उध्वस्त झाले आहेत. पिडीतांचे आर्त किंकाळ्या नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले पोलीस अधीक्षक संदीप पाटील व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, विश्वास नांगरे पाटील ऐकणार का? असा सवाल फलटणकर नागरिक उपस्थित करताना दिसतात. फलटणचे पोलीस राजकीय दबावाखाली काम करतात का? फलटण तालुक्यातील पोलीस लोकसेवक म्हणून घेतलेली शपथ विसरले की काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. क्योंकी पुलीसवाला गुंडा, बन रहा हैफलटण तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय तर फारच तेजीत चालल्याचे आपणास दिसून येईल. कायदा कितीही कडक केला तरी तो राबविणारेच जर मॅनेज होणार असतील तर त्या कायद्याचा उपयोग तरी काय? कुंपणानेच शेत खायला सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे शासनानेही फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच पर्यावरणाला सुद्धा हानी पोहचत आहे. त्यामुळे अवैध वाळू व्यवसाय रोखण्यासाठी नांगरे पाटील काय उपाय योजना करणार! याकडेही फलटणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments

Powered by Blogger.