अभयारण्यात पार्टी करणार्‍या चौघांना अटक


बामणोली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या बामणोली वन्यजीव विभागाच्या हद्दीत माडोशी गावाच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी बेकायदा प्रवेश करून पार्टी केल्याप्रकरणी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी चौघांना अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, माडोशी येथे रात्री पार्टी सुरू असल्याची माहिती अज्ञात इसमाने वन्यजीव विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. यानंतर वन्यजीव विभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल योगेश गावित यांनी आपल्या कर्मचार्‍यांसोबत माडोशी येथे पाहणी केली. त्यावेळी गणेश विठ्ठल निपाणे, नीलेश प्रकाश धनावडे, विशाल प्रवीण वांगडे व मारुती सीताराम सपकाळ हे अभयारण्यात बेकायदा प्रवेश करून पार्टी करत असताना आढळले.

या चौघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक होडी आढळून आली. वन विभागाने ही होडी जप्‍त केली असून सर्वांना अटक केली आहे. दरम्यान, पार्टी करणारे संशयित हे माडोशीपर्यंत बोटीने गेल्याची माहिती अज्ञात इसमाने अधिकार्‍यांना दिली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली. हे युवक बोटीने त्या ठिकाणी आले असताना होडी आली कुठून, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. बोटीऐवजी होडीचा पंचनामा करण्यासाठी बामणोली वन्यजीवच्या अधिकार्‍यांनी स्वत:चे हात ओले केले असल्याची चर्चा रंगली आहे.

No comments

Powered by Blogger.