निसर्ग कॉलनीत बिबट्यांचा वावर वाढला


सातारा : अजिंक्यतारा, निसर्ग कॉलनी परिसरात दोन बिबट्यांचा वावर दररोज वाढला असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत येथील नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार करूनही कोणतीच दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. अजिंक्यतार्‍यालगत असलेल्या निसर्ग कॉलनी, रामराव पवारनगर, गोळीबार मैदान परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर वाढला आहे. हे बिबटे नागरिकांना दिवसाही दिसू लागले आहेत त्यामुळे नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत येथील नागरिकांनी 1 महिन्यापूर्वी वनविभागाला बिबट्यांची कल्पना दिली होती मात्र, अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही.

रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास दोन्ही बिबटे या परिसरात फिरत होते. सुमारे 2 तासाहून अधिक काळ या परिसरात हे बिबटे तळ ठोकून बसले होते. याबाबत नागरिकांनी पुन्हा वनविभागाच्या अधिकार्‍यांना बिबट्यांची कल्पना दिली. मात्र, वनविभागाचे अधिकारी एक ते दिड तासाने घटनास्थळी आले. त्यांनी या बिबट्यांना अजिंक्यतारा किल्ल्याकडे हाकलून दिले. बिबट्यांचा वावर दररोज वाढत चालला असून येथील लहान मुले व नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. तरी वनविभागाने या घटनेची त्वरीत दखल घेवून या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत अमोल काटकर यांनीही वनविभागाकडे तक्रार केली आहे.

No comments

Powered by Blogger.