शिवसागर जलाशयावर होणार पूल


महाबळेश्‍वर : शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर असा 480 मीटर लांब व 15 मीटर रूंद केबलने जोडलेला पूल बांधण्यात येणार आहे. या पुलावर 45 मीटर उंचीवर भव्य विविंग गॅलरी तयार करण्यात येणार आहे. या गॅलरीच्या काचेवर उभे राहून पर्यटकांना या भागातील निर्सगाचा आनंद मिळणार आहे. तापोळासारख्या डोंगरी भागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर केल्यानंतर याला गती देण्यासाठी बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला आहे. तापोळा ते अहीर या पुलाला त्यांनी तातडीने 75 कोटी रूपयांचा निधी मंजूर केलाआहे. हा पुल 2 लेनचा असून पुलावर दोन्ही बाजूला 2 मीटर रूंद फुटपाथ बांधण्यात येणार आहेत. हा पूल पाण्यातील तीन पिलरवर असलेल्या तीन पायलॉनवर केबल स्टे करणार आहे. त्यामधील पायलॉनवर 45 मीटर उंचीवर प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधण्यात येणार आहे.

या पुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर मुख्य अभियंता प्रविण किडे, अधिक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता संजय सोनावणे व उपविभागीय अभियंता एम. एस. पाटील काम करत आहेत. पर्यटकांसह देशभरातून सहलीसाठी येणार्‍या पर्यटकांसाठी हा पूल व त्यावरील विविंग गॅलरी हे नविन आकर्षण ठरणार हे निश्‍चित. या पूलामुळे महाबळेश्‍वर व तापोळा भागाला भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या भागात रोजगारात वाढ होऊन लोकांचे राहणीमान सुधारेल, असा विश्‍वास व्यक्‍त होत आहे.

जर्मन तंत्रज्ञानाचा वापर...

प्रेेक्षकांसाठी बांधण्यात येणारी गॅलरी 30 मीटर बाय 18 मीटर आहे. यामध्ये सुमारे 200 पर्यटकांना एकाच वेळी काचेवर उभे राहून निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. या गॅलरीकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट तर दोन्ही बाजूने वर जाण्यासाठी पायर्‍यांची तरतूद करण्यात आली आहे. पुलाचे बांधकाम व रोपचे काम संपूर्ण जर्मन तंत्रज्ञानांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

No comments

Powered by Blogger.