बोगस संस्थेद्वारे एक कोटीची फसवणूक


कराड : बोगस सहकारी संस्था (सोसायटी) स्थापन करून शासनाची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कराड मध्ये घडलेल्या या प्रकाराच्या मुख्य सूत्रधाराचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबतची फिर्याद कराड सहकारी संस्था दुय्यम निबंधक कार्यालयातील लेखा परीक्षक जब्बार महताब शेख यांनी पोलिसात दिली आहे.

बोगस संस्थेचा चेअरमन संतोष कृष्णात लाड (वय 30, रा. कराड) व सचिव गणेश नाना साळुंखे (35, रा. मानकापूर, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रतीक इंडस्ट्रियल को. ऑफ सोसायटी, ओगलेवाडी, ता. कराड या नावाने काही लोकांनी बोगस संस्था स्थापन केली होती. ही संस्था नोंदणीकृत करून संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शासनाकडे जैविक कोळसा उत्पादन करण्यासाठी शासनाकडे अनुदानाची मागणी केली होती.

त्यानुसार शासनाने संस्थेसाठी 6 कोटी 88 लाखांचे अनुदान मंजूर केले होते. या अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून शासनाने प्रतीक इंडस्ट्रियल को. ऑफ सोसायटी या संस्थेला 1 कोटी रुपये दिले होते. जैविक कोळसा उत्पादन करण्यासाठी मिळालेल्या एक कोटी अनुदानाचा योग्य वापर न करता व शासनाच्या नियमानुसार काम न केल्याने सोसायटीचे चेअरमन, सचिव व संचालकांनी अनुदान म्हणून मिळालेल्या 1 कोटी रुपयांचा अपहार केला. ही बाब निदर्शनास येताच कराड सहकारी संस्था दुय्यम निबंधक कार्यालयातील लेखा परिक्षक जब्बार शेख यांनी 27 ऑक्टोबर 2017 रोजी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसात दिली होती. त्यानुसार बोगस सोसायटीचे चेअरमन, सचिव व संचालक असे 13 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यानुसार कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी तपास केला. त्यामध्ये शासनाकडून अनुदान म्हणून मिळालेले 1 कोटी रुपयाचा अपहार झाल्याचे समोर आल्याने व त्याबाबतचे पुरावे मिळाल्याने त्यांनी याप्रकरणी बोगस संस्थेचा चेअरमन संतोष लाड व सचिव गणेश साळुंखे या दोघांना शुक्रवार दि. 2 रोजी रात्री अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, संचालक म्हणून ज्यांच्या नावावर पोलिसात गुन्हा नोंद आहे, ती नावेही बोगस असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा मुख्यसुत्रधार वेगळाच असून त्याने हा सर्व प्रकार केल्याचे चेअरमन व सचिव सांगत असल्याने पोलिस मुख्यसुत्रधाराचा शोध घेत आहेत.

चेअरमन व सचिवाला संचालक माहिती नाहीत...

बोगस संस्था स्थापन करून त्याद्वारे शासनाचे 1 कोटीचे अनुदान घेऊन अपहार केल्याचा प्रकार कराड पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चेअरमन संतोष लाड व सचिव गणेश साळुंखे यांनाही आपल्या संस्थेत संचालक कोण आहेत? हे माहीत नाहीत. हा सगळा प्रकार करणार मुख्य सूत्रधार वेगळाच असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तो सापडल्यानंतर आणखी काही माहिती व संचालकांची खरी नावे समोर येणार आहेत.

No comments

Powered by Blogger.