‘जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठी ४४५ कोटी’


सातारा : जिल्हयातील बांधकाम सुरू असलेल्या तारळी, धोम-बलकवडी, कुडाळी, वांग व मोरणा (गुरेघर) या सिंचन प्रकल्पांना, केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री कृषी सिंचाई योजनेमधून (झचघडध) एकूण 445 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेकरीता केंद्र शासनाच्या स्पेशल पॅकेजमधून अर्थसहाय्य देण्यास सहमती मिळवण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

सातारा जिल्ह्यातील तारळी, धोम-बलकवडी, कुडाळी, वांग व मोरणा(गुरेघर) या सिंचन प्रकल्पांना केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याने तारळीसाठी 105 कोटी, धोम बलकवडीकरिता 100 कोटी, वांग प्रकल्पाकरीता 50 कोटी, मोरणा गुरेघर 30 कोटी, कुडाळी प्रकल्पासाठी 40 कोटी, उरमोडी प्रकल्पासाठी 100 कोटी असा एकूण 425 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय जिहे कठापूरसाठी 20 कोटी मंजूर करण्यात आले असल्याचे पत्रकात पुढे म्हटले आहे. उरमोडी प्रकल्पामुळे सातारा तालुक्यातील सुमारे 1000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून सातारा डावा कालवा 10 कि.मी.पर्यंत पूर्ण करून त्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. डाव्या कालव्यावरील भोंदवडे उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या टप्यावर असून 14 कि.मी.पाईपलाईनव्दारे सातारा तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सातारा उजवा कालव्यावरील भोंदवडे जलसेतूचे बंद असलेले काम पूर्ण झाले आहे. माण कालव्याचे कि.मी. 20 पर्यंतचे काम पूर्ण करून ऑगस्ट 2017 मध्ये यातून पाणी सोडण्यात आले आहे. 31 कि.मी.लांबीचा हा कालवा जून 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. धोम-बलकवडीतून पुणे जिल्हयातील भोर, सातारा जिल्हयातील खंडाळा व फलटण या दुष्काळी भागास पाण्याचा लाभ होत आहे. या प्रकल्पातील एकूण 147 कि. मी. लांबीच्या उजवा कालव्याचे कि. मी. 93 ते 130 या लांबीतील कामे पूर्ण करून दुष्काळी भागात पाणी पोहचविणेत आले. कि. मी. 140 येथील बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. हा कालवा मार्च 2018 पर्यंत पूर्ण होवून फलटण तालुक्यात दुष्काळी भागातील 51 गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. प्रकल्प 2019 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

कुडाळी प्रकल्पातील कालव्याचे काम बंदिस्त नलिकेद्वारे करण्याचे नियोजन असून या प्रकल्पांसाठी 40 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. धरणग्रस्तांचे प्रश्‍न सोडवून महू धरणाचे काम सुरू केले असून जावली तालुक्यातील 13000 एकर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.

No comments

Powered by Blogger.