कोयना प्रकल्पग्रस्तांचा मोर्चाही जाणार मुंबईला!


पाटण : गेल्या पंधरा दिवसांपासून कोयना प्रकल्पग्रस्तांचे कोयनानगर (पाटण, जि. सातारा) येथे धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे आक्रमक होत आंदोलनकर्ते आंदोलनस्थळी गुढी उभारून मुंबईला कोयनानगर येथून मंत्रालयावर पायी मोर्चा काढणार आहेत. याबाबतची महत्वपूर्ण घोषणा कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी मंगळवारी सायंकाळी केली.

डॉ. पाटणकर म्हणाले, सत्तेतील सरकार भांडवलदारांचे आहे. ५ लाख कोटींचे कर्ज बुडविणाऱ्या भांडवलदारांच्या बैठकीस जाण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ आहे. पण गेली ६० वर्षे आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या कोयना प्रकल्पग्रस्तांकडे पाहण्यास मात्र मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यामुळेच धरणग्रस्तांच्या आंदोलनाची शनिवारपर्यंत दखल न घेतल्यास रविवारी गुढीपाडव्यादिवशी कोयनानगर येथे गुढी उभारण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर सर्व आंदोलक मुंबईकडे पायी रवाना होणार असून मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन केले जाईल. तसेच हे आंदोलन सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेणार नसल्याचा इशारा डॉ. पाटणकर यांनी दिला आहे.

No comments

Powered by Blogger.