पतंगराव कदम गरिबांचे कैवारी - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरमुंबई :  "भारती विद्यापीठाचे संस्थापक आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम गरिबांचे कैवारी होते", असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. डॉ. पतंगराव कदम यांना विधान परिषदेत सोमवारी आदरांजली वाहण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
डॉ. कदम यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधान परिषदेत सभागृह नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. शोक प्रस्तावावर बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, "डॉ. पतंगराव कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. सर्व सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली."
"त्यांचे शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे. ते गोरगरिबांचे कैवारी होते. त्यांनी पंढरपूर येथे वारकरी भवन बांधले. माणसांना माणसाशी जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.''
महसूलमंत्री पाटील म्हणाले, "डॉ. पतंगराव कदम हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी अनेक विभागाचे मंत्रिपद भूषविले. प्रत्येक खात्याचे मंत्री म्हणून केलेले त्यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांनी प्रत्येक विभागाला न्याय दिला. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना केली. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे विश्व निर्माण केले.''
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, " डॉ. पतंगराव कदम हे त्यांच्या मनाप्रमाणे जीवन जगले. खोटा आव त्यांनी कधीही आणला नाही. जमिनीवर पाय ठेवून ते सर्वांशी समरस व्हायचे. मला ते नेहमी प्रेरणा देत असत. त्यांचे अचानक जाणे धक्कादायक आहे."
परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधान परिषद सदस्य भाई जगताप, रामहरी रुपनवर,आनंदराव पाटील, जोगेंद्र कवाडे, निरंजन डावखरे, बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करून डॉ. कदम यांना आदरांजली वाहिली.No comments

Powered by Blogger.