‘भ्रष्टाचार करता येत नसल्याने विरोधकांची सरकारवर टीका’


कराड : ‘‘सभागृहात अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर करताच विरोधकांना कधी एकदा टीव्हीसमोर जातो आणि सरकारवर टीका करतो, असे होते. विरोधक अर्थसंकल्पाचा अभ्यासच करत नाहीत. राज्याचे दरडोई उत्पन्न वाढले आहे, असे असताना राज्य प्रगतीपथावर आहे, हे म्हणायचे नाही का? असा प्रश्न उपस्थित करत ज्यांना शासकीय योजनांतून भ्रष्टाचार करता येत होता, त्यांना तो आता करता येत नसल्यानेच असे लोक शासनावर टीका करतात, अशी घणाघाती टीका विरोधकांवर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केली आहे.

भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कराडच्या शासकीय विश्रामगृहात राज्याच्या अर्थसंकल्पातबाबत माहिती देताना आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘राज्य शासनाने मागासवर्गीय विद्यार्थी तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी निधीची तरतूद केली आहे. मात्र, हा निधी पडून आहे. यावरूनच जे विद्यार्थी शासकीय योजनांचा लाभ घेतात आणि शासनाकडून प्रत्यक्षात तरतूद होत होती, त्यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते आहे. काही संस्थाचालक विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखवत अनुदान लाटत होते, असा दावा करत ज्यांना शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचार करता येत नाही, असेच लोक सरकारविरोधात बोलतात.’’ असा आरोप चरेगावकर यांनी केला.

चरेगावकर म्‍हणाले, ‘‘अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडताना त्यावर अभ्यास न करता सरकारवर टीका करण्यासाठी वापरली जाणारी नेहमीची गुळगुळीत झालेली वाक्येच आपणाला टीव्हीवर ऐकायला मिळतात.’’ असा टोलाही चरेगावकर यांनी यावेळी लगावला.

No comments

Powered by Blogger.