डोंगरी गावांना वाढीव निधी देणार : शंभूराज देसाई


सणबूर : गेली 26 वर्षे डोंगरपठारावरील गावांनी आणि वाड्यावस्त्यांनी माजी आमदारांना भरभरुन मते दिली. त्यांनी डोंगरपठारावरील गावांमध्ये किती विकास केला? असा सवाल करीत गेली साडेतीन वर्षे मी या तालुक्याचा आमदार म्हणून काम करताना डोंगर पठारावरील या विभागातील सुमारे 15 ते 20 गावांमध्ये कोटयवधी रुपयांची विकासकामे करुन दाखविली आहेत. यापूर्वी डोंगरपठारावरील गावांना आणि वाड्यावस्त्यांना दिलेल्या कामांच्या दुप्पट कामे यंदाच्या वर्षी देऊन डोंगरपठारावरील या गावांचा विकास साधणार असल्याची ग्वाही आ. शंभूराज देसाई यांनी डोंगरपठारावरील गावे व वाड्यांवस्त्यांकरिता आयोजित डोंगरी परिषद व कार्यकर्ते मेळाव्यात दिली.

काटीटेक (ता.पाटण) याठिकाणी डोंगरी परिषद व कार्यकर्ता मेळावा झाला. मेळाव्यास डोंगरी युवा संघटनेचे संपर्क प्रमुख रामचंद्र पवार, अध्यक्ष हणमंत पिसाळ, कार्याध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ शिर्के, सचिव धर्मेंद्र पवार, उपसचिव राम झोरे, बबनराव माळी यांच्यासह कुसवडे, वाटोळे, गावडेवाडी,काठी, जाईचीवाडी बोंद्री, घेरादातेगड, म्हारवंड, निवकणे व घाणबी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. देसाई म्हणाले, यापूर्वी या विभागातील डोंगरपठारावर आम्हाला बसायला घोंगड टाकलं तरी त्या ग्रामस्थांना वाळीत टाकण्याचे प्रकार विरोधकांकडून घडत होते. परंतु, या विभागातील ग्रामस्थांनी विरोधकांची दडपशाही धुडकावून ते निर्भीड झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांची विकासकामे पठारावर होऊ शकली. गत साडेतीन वर्षांत मला या विभागातील असो वा तालुक्यातील गावांमधून असो विधानसभेच्या निवडणुकीला किती मते पडली याचा कधीच विचार न करता ज्या- ज्या गावांनी माझ्याकडे कामे मागितली त्या -त्या गावांना आणि वाड्यावस्त्यांना कामे देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.

त्यांच्या हातात देण्यासारखे असताना ते आपल्याला काही देऊ शकले नाहीत. आता त्यांच्या हातात देण्यासारखे काही नसताना ते आपल्याला काय देणार आहेत. त्यामुळे जनतेने विकास कामासोबत रहावे, असेही आ. देसाई म्हणाले. स्वागत बबनराव माळी यांनी केले. आभार रामचंद्र पवार यांनी मानले.

डोंगरी जनतेकडून आ. देसाई यांना धन्यवाद


डोंगर पठारावरील लोकांच्या समस्या जाणून,समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी माजी आमदारांनी कधीच डोंगरी परिषद किंवा कसला मेळावा घेतला नाही.पाटण तालुक्यात पहिल्यांदाच पठारावरील जनतेच्या समस्या सोडविण्याकरीता डोंगरी परिषद घेतल्याने जनतेने आ. शंभूराज देसाई यांचे आभार मानले.

No comments

Powered by Blogger.