साताऱ्यात घरफोडी केलेल्या चोरट्यांना बेड्या


सातारा : सातारामधील करंजे येथे घरफोडी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली. चोरीला गेलेला 64 हजार रुपये किंमतीचा सर्व ऐवज जप्त केला. दरम्यान, संशयितांमध्ये मुंबई, मानखुर्द येथील सोनाराचाही समावेश असून पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत. दत्ता उत्तम घाडगे (रा.करंजे) व जयसिंग उर्फ विनोद तुकाराम केदार (रा.मानखुर्द, मुंबई) अशी दोन्ही संशयितांची नावे असून यातील केदार हा सोनार आहे. दरम्यान, या चोरीप्रकरणी तुळशीराम गणपत चव्हाण (वय 61, रा,करंजे, सातारा) यांनी दि. 6 मे रोजी घरफोडी झाल्याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मेला तक्रारदार तुळशीराम चव्हाण हे घराला कुलुप लावून दरवाजा लगतच किल्ली बाजूला ठेवून बाहेर पडले होते. यावेळी अज्ञाताने संबंधित घराची किल्ली ताब्यात घेवून घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण 64 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला होता. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार किशोर जाधव व जयराम पवार यांना संशयित चोरट्याबाबतची माहिती मिळाली.

शाहूपुरी पोलिसांनी संशयित दत्ता घाडगे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. सोन्याच्या दागिन्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ते सोने विनोद केदार या सोनाराला मुंबई येथे विकले असल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी दोघांकडे चौकशी करुन सर्व मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर धुमाळ, पोनि चंद्रकांत बेदरे, पोलिस हवालदार किशोर जाधव, जयराम पवार, प्रवीण गोरे, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

No comments

Powered by Blogger.