Your Own Digital Platform

विखळे येथे एका रात्रीत तीन घरफोडया


मायणी : खटाव तालुकातील विखळे या गावी काल मध्यरात्री तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन घरफोड्या करून ७० हजार रुपयांच्या रोख रकमेसह ३ लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना घडली .

या संदर्भात रामचंद्र लक्ष्मण देशमुख यांनी मायणी पोलीस दूर क्षेत्रात दिलेली तक्रार याप्रमाणे- रामचंद्र- देशमुख हे रात्री जेवण करून आपल्या घराच्या अंगणात सहकुटुंब झोपले होते .पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी सौ. शोभा या जाग्या झाल्या असता त्यांना घराचे दार उघडे असून आत चोर असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला . चोरटयांची चाहूल लागताच रामचंद्र देशमुख यांनी एका चोरट्याला पकडले मात्र दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या दिशेने दगड मारल्याने त्यांच्या कानाला जखम झाली. या झटापटीचा फायदा घेत पकडलेला चोर व त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले .शेजारील लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले .या घरफोड्यांमुळे विखळेकर ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

याबाबत रामचंद्र देशमुख व सूरज देशमुख यांनी चोरीची फिर्याद दिली आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विखळे ढोकळवाडी रस्त्याच्या कडेला विखळे गावापासून उत्तरेला अर्धा किलोमीटर अंतरावर रामचंद्र देशमुख यांच्या वस्तीवर मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास गेटच्या आत प्रवेश करून उषा ची चावी घेऊन बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील तिजोरीमध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम यावर चोरटयांनी डल्ला मारला. यामध्ये साडेतीन तोळ्याचे गंठण ७०हजार रुपये ,एकेक तोळ्याच्या दोन सोन्याच्या चैनी, अर्ध्या तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, चार ग्रॅम वजनाचा कानातील सोन्याचा वेल,चार ग्रॅमच्या लहान मुलांच्या चार अंगठ्या, चार ग्रॅमचे चार बदाम, पैंजणाचे दोन जोड व रोख रक्कम ५००० रुपये अशी एक लाख ५९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कमअज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद रामचंद्र देशमुख यांनी दिली. या चोरट्यांनी शेजारील सुरज देशमुख यांच्या घरी वरील पद्धतीने चोरी केली .अंगणामध्ये आठ-दहा लोक झोपलेले होते बंद घराचे कुलूप काढून कपाटातील रोख रक्कम ६५ हजार रुपये, दोन तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याची चैन ,लहान मुलांचे 2 ग्रॅमचे दोन बदाम ,2 ग्रॅमचे ब्रासलेट असा १,३१,०२१रुपयांचा ऐवज चोरून नेला. विखळे गावामध्येही चोरट्यांनी महादेव मंदिराजवळील एका घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी त्यांच्या हाती काहीच लागले नाही .एकाच रात्रीत विखळे येथे तीन घरफोड्या झाल्याने व सुमारे तीन लाखाचा ऐवज चोरीला गेल्याने परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले असून पोलिसांनी पूर्वीप्रमाणे गस्त सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.