Your Own Digital Platform

भुईंज पोलिसांना बीडमध्ये मारहाण


सातारा :सातारा जिल्ह्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितास अटक करण्यासाठी गेलेल्या सातारा आणि बीडच्या पोलिसांना संशयित आणि त्याच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना नाळवंडी येथील लक्ष्मी तांड्यावर घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड तालुक्यातील नाळवंडी तांडा येथील गोवर्धन लक्ष्मण राठोड आणि मैदा येथील देवीदास मोतीराम राठोड या ऊसतोड मुकादमांवर उचल घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांना अटक करण्यासाठी दि. 23 मे रोजी पोलिस कर्मचारी जितेंद्र इंगुळकर आणि पोलिस नाईक आनंदा भोसले हे बीड जिल्ह्यात कारवाईसाठी गेले होेते.

यासाठी त्यांना स्थानिक पोलिस कर्मचारी मदतीसाठी देण्यात आले. या सर्व कर्मचार्‍यांनी लक्ष्मी तांडा येथे राठोड याला ताब्यात घेतले असता त्याने हुज्जत घालायला सुरुवात केली. ‘तुम्हाला महागात पडेल, मी पत्रकारांना बोलावून घेईन,’ अशा धमक्या तो देऊ लागला. त्याचा गोंधळ ऐकून त्याची पत्नी राधाबाई राठोड, सून सुनीता राठोड, मुलगा संजय राठोड, तसेच गावातील शिवाजी लिंबा राठोड, नरहरी काशीनाथ राठोड, चंद्रकांत रेखू राठोड (सर्व जण रा. नाळवंडी, लक्ष्मी तांडा) हे तिथे जमा झाले. या सर्वांनी पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली.

त्यानंतर मैदा येथेही याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. या ठिकाणी देवीदास राठोड, त्याची पत्नी, भाऊ किसन मोतीराम राठोड (सर्व रा. मैदा, पो. घाटसावळी) यांनी पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण केली. पोलिसांना मारहाण केल्यानंतर हे सर्व जण पळून गेले. याप्रकरणी जितेंद्र इंगुळकर यांनी फिर्याद दिली असून, 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.