ल्होत्से शिखरावर तिरंगा फडकला.!


सातारा : दि. 15 मे 2018 च्या मध्यरात्री प्रियांका मोहितेने पृथ्वीतलावरील सर्वोच्च असलेल्या हिमशिखर माऊंट एव्हरेस्टचा शेजारी आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे अत्त्युच्च आणि अत्यंत अवघड श्रेणीचे हिमशिखर ‘माऊंट ल्होत्से’ (8516 मीटर) यशस्वीरीत्या सर करुन इतिहास घडवला. यापूर्वी 2013 मध्ये तिने माऊंट एव्हरेस्टलाही (8,850 मीटर) गवसणी घातली होती. एव्हरेस्ट आणि ल्होत्से ही अत्त्युच्च हिमशिखरे सर करणारी ती पहिली अल्पवयीन भारतीय महिला (25 वर्षे) ठरली आहे. प्रियांका मोहिते हिने जगविख्यात माऊंट एव्हरेस्ट सर करण्याकरिता सह्याद्रीच्या खडकांशी अविरत धडका घेऊन तयारी केली. सराव, पौष्टिक आहार, अतिउंचीवरील त्रासदायक आजार, सावधगिरीचे उपाय आणि साध्या सोप्या गिर्यारोहणाचं गमक अशी सारी माहिती तिने मिळवली.अनेक पुस्तकांमधून साहसी गिरीजगताची ओळख तिने करुन घेतली. मुंबईत एव्हरेस्टवरील भारताच्या पहिल्या यशस्वी नागरी मोहिमेचे नेते ऋषिकेश यादव, क्रीडा मानसशास्त्रातील भीष्माचार्य बामसरांचं मार्गदर्शनही तिने मिळवलं. त्यांच्या व्याख्यानांमुळे तिचा स्वतःवरचा आत्मविश्‍वास बळावण्यास बरीच मदत झाली.

‘माऊंट ल्होत्से’ हा हिमपहाड चढाईच्या बाबतीत माऊंट एव्हरेस्टच्या कैकपटीने अवघड. अधिकाधिक शारीरीक क्षमता, धैर्य आणि प्रचंड क्षमतेच्या मनोबलाची मागणी करणारा. अनेक कसोट्यांवर आरोहकाला रगडवून घेतल्याशिवाय यशाची सावलीही नजरेस पडू न देणारा. वेळ पडलीच तर प्राणाशीही गाठ बांधणारा आणि प्रियांका मात्र जोरदार तयारीमुळे सर्वच कसोट्यांमधून प्राणाचीही पर्वा न करता अपेक्षेप्रमाणेच तावून सुलाखून निघाली अन् ल्होत्से या हिमपर्वताने तिला आपल्या अधिराज्याचं सम्राज्ञीपद बहाल केलं. 16 मे च्या पहाटे तिने एव्हरेस्टचा सहोदर ‘ल्होत्से’ पादाक्रांत करुन इतिहास घडवला.

प्रियंका मोहिते ही ‘ल्होत्से’ सर करणारीच नाही तर एव्हरेस्ट आणि ‘ल्होत्से’ सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली..! गेल्या दोन वर्षांपासून तिने जगातील चौथ्या क्रमांकाचे अत्त्युच्च हिमशिखर ‘ल्होत्से’ चा ध्यासच घेतला होता. आफ्रिकेचं सर्वोच्च हिमशिखर ‘किलीमांजरो’देखील तिने सहजच काबीज केलं होतं. एव्हरेस्ट सर केलं ते वर्ष खरंतर प्रियांकाचंच होतं. एव्हरेस्टच्या तयारीत असतानाच ती विज्ञान शाखेतून प्रथम श्रेणीने पदवीधर झाली. इतकंच नाही तर कॉलेजक्‍विनचा किताबही मिळवला आणि त्याच वर्षी ती नृत्यविशारदही झाली होती. दरम्यान ‘ल्होत्से’ शिखर सर करुन तर आता प्रियंकाने गगनालाच गवसणी घातली आहे...!

No comments

Powered by Blogger.