खा. शरद पवारांकडून पाणी टंचाईचा आढावा


सातारा :  सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह माण, खटाव तालुक्यात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. या प्रश्‍नाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे गार्‍हाणे मांडले. सर्कीट हाऊसवर झालेल्या बैठकीत खा. पवार यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व जिल्हाधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि जलसंधारणाच्या कामाचा आढावा घेतला.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त खा. शरद पवार हे मंगळवारी सातारा दौर्‍यावर आहेत. सातार्‍यात आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात खा. शरद पवार यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे व रयतच्या पदाधिकार्‍यांनी पुष्पगूच्छ देवून स्वागत केले.विश्रामगृहावर खा. शरद पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रराजे भोसले, माजी आ.विक्रमसिंह पाटणकर,प्रभाकर घार्गे, राजू भोसले, जिल्हासरचिटणीस राजकुमार पाटील, सुधीर धुमाळ यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी राज्यातील उसाची परिस्थिती व साखर कारखान्यासंदर्भात खा. शरद पवार यांची पदाधिकार्‍यांबरोबर चर्चा सुरू होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या दालनात आल्यानंतर त्यांनी खा. शरद पवार यांचे पुष्पगूच्छ देवून स्वागत केले.

 त्यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी डोंगरी भागातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असलेले झरे आटण्यास सुरूवात झाली असल्याने डोंगरी भागात पाण्याची भिषण टंचाई जाणवण्यास सुरूवात झाली असल्याचे सांगितले त्याबाबत जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशा सूचना खा. शरद पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या.

जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती काय आहे. याबाबतही खा. शरद पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी ज्या गावांनी टँकरची मागणी केली आहे त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असल्याचे सांगितले.जलयुक्त शिवारची माण व खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.तसेच वॉटरकप स्पर्धेतील गावांना निधीची घोषणा केली होती त्यापैकी किती जणाचा निधी मिळाला याबाबतही खा. शरद पवार यांनी विचारणा केली.

त्यानंतर खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठकीला प्रारंभ झाला. बैठकीस माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे पाटील, चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्यासह रयतचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत खा. शरद पवार यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत नव्याने कोणते उपक्रम राबवायचे यावर चर्चा केली. संस्थेच्या ज्या शाखांना ए ग्रेड मिळाली आहे. मात्र काही शाखांमध्ये त्रुटी आहेत त्यांच्या शाखा प्रगतीबाबतचे प्रेझेटेंशन दाखवण्यात आले. संस्थेमार्फत नवीन अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील त्यादृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचना खा. शरद पवार यांनी मॅनेजिंग कौन्सीलची सुमारे 4 तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत दिल्या.संस्थेतील बैठक संपल्यानंतर खा. शरद पवार हे शासकीय विश्रामगृहावर आले.

No comments

Powered by Blogger.