भाजप-सेनेच्या पापाचे उत्तर कर्नाटकने दिले


कुडाळ : भाजप-शिवसेनेचे युती सरकार नौटंकी सरकार आहे. राज्यातील सहकार मोडीत काढण्याचे पाप यांच्या माथी लागले आहे. बाजार समित्या बरखास्त करुन माथाडींना देशोधडीला लावण्यासाठी सध्या ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पापाचे उत्तर जनतेने कर्नाटकच्या निकालाने दिले आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी लगावला.

करहर पानसपाटी येथे जावली बँकेचे नूतन चेअरमन चंद्रकांत गावडे पाटील व व्हा. चेअरमन प्रकाश मस्कर यांचा सत्कार व शेतकरी मेळावा अशा संयुक्‍त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती सौ. अरुणा शिर्के, उपसभापती दत्ता गावडे, हिंदुराव तरडे, सौरभ शिंदे, विक्रम भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजप सरकारने राज्यातील सहकार अडचणीत आणला असल्याचे सांगून आ. अजित पवार पुढे म्हणाले, सध्या सातारा, सांगली जिल्ह्यांतील एकही मंत्री नाही. आमच्या काळात पश्‍चिम महाराष्ट्राला भरभरून न्याय देण्यात आम्ही कुठंही कमी पडलो नाही. सरकार जिथं निधीची गरज नाही तिथं स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी निधी टाकत आहे. बुलेट ट्रेनऐवजी धरणांना व शेतीपूरक सुविधांना निधी देण्याची गरज आहे. हे सरकार शेतकरीविरोधी असून ते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. विकासाच्या नावाने सुरु असणारी नौटंकी आता थांबवा. शेतकरी, नोकरदार, युवक यांना न्याय मिळवून देण्यासाठी शरद पवार जे उमेदवार देतील त्यांना बहुसंख्येने निवडून आणा.

ते पुढे म्हणाले, जावली तालुक्याच्या व मुंबई माथाडीच्या कष्टकरी जनतेसाठी हभप कळंभे महाराज व भिलारे गुरुजी यांनी जावली सहकारी बँकेची निर्मिती केली. ही बँक खूप जपा, आगामी काळात ही बँक नक्‍की शेड्युल बँक म्हणून नावारूपाला येईल. बँकेचे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन हे मोठे धडाडीचे असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही बँक आणखी प्रगतीपथावर जाईल.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जावलीच्या डोंगर कपारीत शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या चंद्रकांत गावडे यांनी स्वकर्तृत्वाने जावली बँकेच्या चेअरमनपदापर्यंत मजल मारली हे, निश्‍चितच गौरवास्पद आहे. जावली बँकेत दत्तात्रय महाराज कळंबे आणि ज्येष्ठ नेते भि.दा. भिलारे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या विचारांचा ठेवा असलेली जावली बँक जिल्ह्याचा मानबिंदू आहे. नवनिर्वाचित चेअरमन चंद्रकांत गावडे व व्हा. चेअरमन प्रकाश म्हस्कर बँकेची प्रगती व लौकिक वाढवतील, असा विश्‍वास आहे. मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे दर्जेदार होत आहेत. ही कामे मंजूर करण्याचे काम आमदार करतात. परंतु, काही जण जनतेची दिशाभूल करत आहेत. कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावचे तसेच संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी कार्यकर्ते, नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.