कर्नाटकात काँग्रेसची पिछेहाट झाली आणि भाजपने मुसंडी मारली


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातार्‍यात कर्नाटकाच्या निकालावर केलेले भाकित अखेर खोटे ठरल्याचेच संख्याबळावरून तरी दिसत आहे. भाजपाने मुसुंडी मारली असून काँग्रेसला शतकापर्यंत मजल मारता आलेली नाही. भाजपने वरचष्मा राखला असला तरी काँग्रेस व जेडीएस यांच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना तेवढाच दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे. कर्नाटकाच्या निकालानंतर महाराष्ट्राची मोहीम हातात घ्यायला निघालेल्या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात कर्नाटकाच्या निकालाने त्यामुळेच धसका बसला आहे. भाजपची सातारा जिल्ह्यातील नवी फळी खुशीत गाजरं खावू लागली असून काँग्रेस मात्र पूर्ण टेन्शनमध्ये गेली आहे. कर्नाटकाच्या मोहिमेनंतर शरद पवार महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाची मोहीम आक्रमकपणे हातात घेणार होते. त्यासाठी स्वत:चा बालेकिल्ला असलेल्या सातार्‍यातच त्यांनी कर्नाटकचे भाकित मांडले होते. पवार नेहमीच त्यांच्या मोहिमांचा प्रारंभ सातार्‍यातून करतात. मात्र, पवारांचे भाकित खोटे ठरले. कर्नाटकात काँग्रेसची पिछेहाट झाली आणि भाजपने मुसंडी मारली. अनेक राजकीय जाणकारांचे भविष्य खोटे ठरले. कर्नाटकच्या निकालावर काँग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्राची गणिते मांडली होती. कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर राहिल आणि त्या आधारे भाजपला जनता नाकारू लागली आहे. आता परिवर्तन होणार असा नारा देवून महाराष्ट्राची मोहीम सुरू करण्याचे मनसुबे होते.मात्र, कर्नाटकात वेगळेच घडले. त्याचा झटका महाराष्ट्रातही बसेल की काय अशी शंका येवू लागली आहे.

पवारांचे बलस्थान सातारा आहे. पवारांच्या पक्षात सर्वाधिक आमदार सातार्‍यातील आहेत. त्यामुळे काँग्रेस अथवा राष्ट्रवादीच्या विरोधात कुठे निकाल गेला की त्याचे पडसाद सातार्‍यात उमटतात. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये व खासदारांमध्ये खसखस पिकते, हलचल वाढते. कर्नाटकच्या निकालानंतर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. या उलट भाजप तशी सातारा जिल्ह्यात नवखी आहे. मात्र, कर्नाटकच्या निकालानंतर सातार्‍यात आम्ही काहीही घडवू शकतो, असा नारा घेवून भाजप बाहेर पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या निकालाने सातारा जिल्ह्यातील भाजपची मंडळी साखर वाटू लागली आहेत. हा निकाल सातारा जिल्ह्यातील भाजपसाठी उर्जा व प्रेरणा देणारा ठरणारा आहे.

काँग्रेसनेही या निकालाने धसका घेतला आहे. मुळातच राष्ट्रवादीच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद नगन्य आहे. इनमिन दोन आमदार अशी सातारा जिल्ह्याची काँग्रेस आहे. कर्नाटकचा निकाल भाजपच्या बाजूने गेल्यामुळे काँग्रेसच्या देशपातळीवरील नेतृत्वाबद्दल शंका निर्माण होत आहेत. त्याचा फटका सातारा जिल्ह्यातील काँग्रेसला बसण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातही काँग्रेस व राष्ट्रवादीची तोंडे विरूद्ध बाजूला असली तरी कर्नाटकात काँग्रेस व जेडीएस एकत्रितपणे सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत आहेत. तसे झाले तर काँग्रेस व राष्ट्रवादीलाही महाराष्ट्रात व जिल्ह्यात एकत्र नांदायला वातावरण निर्मिती पोषक ठरणार आहे. कर्नाटकच्या निकालाचा बोध घेवून काँग्रेस व राष्ट्रवादी नेमके कोणते उपाय योजतात हे पाहणे आता कुतुहलाचे ठरणार आहे.

No comments

Powered by Blogger.