जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाटण तालुक्याला भरीव निधी देऊ : अध्यक्ष संजीवराजे


पाटण :महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कोयना धरणासह पाटण तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्य़ासह महाराष्ट्रावर या तालुक्याचे खुप मोठे उपकार आहेत. खरीप हंगाम नियोजनामध्ये पाटण तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी सर्व सबंधित विभागांच्या मागणीप्रमाणे भरीव निधी दिला जाईल त्याच्या अंमलबजावणी बाबतीत सातारा जिल्हा परिषद कोठेही कमी पडणार नाही असे आश्वासन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
पाटण येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित पाटण तालुका खरीप हंगाम सन २०१८-१९ आढावा व नियोजन सभेत ते बोलत होते.

यावेळी या सभेसाठी व्यासपीठावर सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मनोज पवार, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगौंड, सदस्या संगीता खबाले- पाटील, बापू जाधव, जिल्हा कृषी अधिकारी चांगदेव बागल, पाटण पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, गट विकास अधिकारी संजीव गायकवाड, सहायक गट विकास अधिकारी जयवंत वाघ, सदस्य प्रतापभाऊ देसाई, विलास देशमुख, बबनराव कांबळे,उज्ज्वला लोहार, निर्मला देसाई, काकासो पवार, सौ.मोरे, तालुका कृषी अधिकारी प्रविण आवटे, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष संजीवराजे पुढे म्हणाले की, पाटण तालुका हा दुर्गम व अतिवृष्टीचा तालुका आहे. येथील शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान डोळ्यासमोर ठेवून खरीप हंगाम यशस्वी करावा. आम्ही जिल्ह्यात हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून खरीप हंगाम सभा घेत आहोत. ग्रामीण भागात काम करणारी पं.स.जि.प. शेतकरी बांधवांच्या साठी जबाबदारीने काम केले पाहिजे, शिक्षण, आरोग्य, कृषी या योजनेत सातारा जिल्हा परिषद भरीव काम करत असून आपल्या तालुक्याच्या मागणी प्रमाणे १०० टक्के निधी दिला जाईल, तालुक्यातील नादुरुस्त शाळा खोल्या दुरूस्तीसाठी ग्रामीण विकास यंत्रणेकडे जि.प च्या माध्यमातून प्रस्ताव दिल्यास सबंधित शाळांना दुरूस्तीसाठी निधी दिला जाईल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या जाचक अटी शिथिल करून त्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मागासवर्गीय शेतकऱ्यांना कसा दिला जाईल याबाबत आखणी केली जाईल. डि.बी.टी. योजनेतील

बियाणे खरेदीची अट शिथिल करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना थेट बियाणे खरेदी करता येईल.

शेतकरी बांधवांच्या जमिनीच्या मशागतीसाठी लागणारी यांत्रिक औजारे जिल्हा परिषदेचे वतीने मागणी प्रमाणे पुरविण्यात येतील, या योजनांचा लाभ घेऊन तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपले आर्थिक जीवनमान सुधारावे असे आवाहन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

यावेळी बोलताना कृषी सभापती मनोज पवार म्हणाले की, सर्व्हिस प्रोप्रायटर योजना जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कित्येक पटीने वाचणार आहे. त्या योजनेच्या जनजागृती साठी प्रत्येक गटामध्ये कार्यशाळा घेतली आहे. पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी बाबत व ज्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत, त्या बाबतीत नियोजन करणेसाठी सबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावली जाईल. या तालुक्याचे पर्जन्यमान भौगोलिकदृष्टय़ा लक्षात घेता उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून रासायनिक खते व अनावश्यक औषधांचा वापर टाळला पाहिजे. कर्मचार्‍यांचा तुटवडा या तालुक्यात आहे ती पदे १०० टक्के भरली पाहिजेत यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न करू, डिबीटी सारख्या योजनेत शेतकऱ्यांना लाभ मिळणेकामी आम्ही प्राधान्य देत आहोत, या योजनेकडील विविध योजनांची सबसिडी ही गोरगरिबांना न मिळताच धनदांडग्यांना मिळणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. डिबीटी योजनेतून बियाणे खरेदीची अट शिथिल केली असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी बजेट वाढवून दिले आहे, तळागाळातील शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याची काळजी सबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असे असे सभापती मनोज पवार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जिल्हा कृषी अधिकारी चांगदेव बागल म्हणाले की, पाटण तालुक्यात यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही, अधिकारी वर्गाने खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे असे आवाहन केले.

उपसभापती राजाभाऊ शेलार म्हणाले की,पाटण तालुका दुर्गम व पावसाळी असल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांना खरीपासाठी साहित्य, बियाणे, तसेच इतर निधी भरघोस प्राधान्याने जिल्हा परिषदेचे कडून मिळावा अशी मागणी केली. तसेच पाटण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारावे असे आवाहन शेवटी केले.

यावेळी उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी खरीप हंगाम सभेला काही विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने खंत व्यक्त केली.

पंचायत समिती सदस्य प्रताप देसाई म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध विभागाच्या वतीने विविध योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या साहित्य खरेदी अनुदान मिळण्याबाबत डिबीटी योजनेच्या जाचक अटीमुळे अडचणी येत आहेत त्या शिथिल कराव्यात त्या मुळे सर्व सामान्य लाभार्थ्यांना लाभ देणे सोपे जाईल, तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची जाचक अटी शिथिल कराव्यात. जिल्हा परिषदेने पाटण तालुक्यात विविध योजना राबवून अंमलबजावणी करावी.

यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रविण आवटे यांनी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

प्रास्ताविकात पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत शिंदे यांनी पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या व पूर्ण केलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

स्वागत गट शिक्षणाधिकारी संजीव गायकवाड यांनी केले तर आभार कृषी अधिकारी प्रशांत शिंदे यांनी मानले. या सभेच्या नियोजनासाठी कृषी अधिकारी प्रशांत शिंदे, विस्तार अधिकारी संदिप कुंभार, पवन गायकवाड, एसटी काळे यांनी परिश्रम घेतले.

या सभेसाठी पाटण तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, सहकारी संस्था प्रतिनिधी, खतविक्रेते, शेतकरी बांधव बहुसंख्येने हजर होते.

No comments

Powered by Blogger.