मायणी येथे टँकरद्वारे दूषित पाणी पुरवठा


मायणी : मायणी तालुका खटाव येथील माळीनगर वस्तीवर शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरमधून दूषित पुरवठा होत असल्याची गंभीर घटना घडली असून याबाबत शासनाने तातडीने टँकर चालकांवर कारवाई करून माळीनगर येथील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रा.पं. सदस्य रणजित माने यांनी केली आहे .

याबाबत रणजीत माने यांनी दिलेली माहिती अशी _ ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून मे महिना सुरू होण्यापूर्वीच टँकरद्वारा मायणी परिसरातील वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा करणे अगत्याचे होते .परंतु निम्मा मे महिना उलटत आला तरी देखील मायणी परिसरातील वस्त्यांवर टँकरद्वारा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची फार मोठी कुचंबना होत होती .ही बाब लक्षात घेऊन विरोधी पार्टीतील आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चातून टँकर सुरू केले .वास्तविक यापूर्वी ग्रामपंचायती प्रतिवर्षी मार्च महिन्यामध्येच मायणी व परिसरातील वाड्या वस्त्यांवर टँकर सुरू करीत असे .मात्र ग्रामपंचायतीने यांचा पाठपुरावा न केल्यामुळेच या वर्षी साधारणपणे पंधरा मे पासून मायणी परिसरातील वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा उशिराने सुरू झाला .दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे उशिरा झालेले टँकर शुद्ध पाणी घेऊन येतील असे वाटत असतानाच या टँकरमधून दूषित पाणी आणण्यात येत आहे.सदर टँकर हे यापूर्वी मळी वाहण्यासाठी वापरले असल्याने व ते स्वच्छ न करताच त्यातून पाणी आणल्याने सदर पाण्यास मळीचा वास येत आहे .त्याचप्रमाणे बॅरेलमध्ये टँकरचे पाणी ओतल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिल्याचे दिसत आहे .त्यामुळे मळीमिश्रीत पाणी पिल्याने नागरिकांना विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने टँकर चालकांवर कारवाई करून स्वच्छ अशा टँकरमधून मायणी व परिसरातील वाडय़ा वस्त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे .
माळीनगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून टँकरमधून दूषित पाणी पुरवठा येत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आल्यानंतर माजी सरपंच दादासो कचरे, ग्रा.पं. सदस्य रणजीत माने ,महेश जाधव .गजानन माळी , शहाजी माळी , अनिल दगडे यांनी माळीनगरला भेट देऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करून सदर दूषित पाणी महिने प्रा.आ. केंद्रामध्ये तपासणीसाठी देण्यात आले . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर पाणी दूषित व पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले. .


गेले दोन तीन दिवस टँकरमार्फत दूषित पाणीपुरवठा होत असून आरोग्य विभाग केवळ सूचना देत आहे तर ग्रामपंचायतीचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे .या दोन्ही विभागांना सूचना देऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी .
                               -सरपंच -सचिन गुदगे 


मायणी परिसरातील वाड्या वस्त्यांवर टँकर सुरू करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला .या प्रयत्नांतून मायणी परिसरातील वाड्यावस्त्यावर चार टँकर सुरू झाले .सदर टँकरमधील पाणी शुद्ध व चांगले आहे मात्र ते पाणी पूर्वी मळी वाहून नेत असलेल्या टँकरमधून आणल्याने सदर पाण्यास वास येत आहे .या बाबतीत टॅंकर मालकांवर योग्य ती कार्यवाही करून या वाड्या वस्त्यांवर तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा अशा प्रकारची विनंती संबंधित विभागास दिली आहे. .पाणी दूषित येण्यात ग्रामपंचायतीचा काहीही दोष नसून पंचायत समितीची चूक आहे .कारण पंचायत समितीमार्फत सदर पाणी वाहतूक करण्यासाठी टँकर पाठविण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.