ट्रान्स्फॉर्मरची कामे करा नाहीतर बघतोच


सातारा : ‘एमएसईबी’संदर्भात सातारा जिल्ह्यातील जनतेच्या वाढत्या तक्रारी असून, गुरुवारी रात्री वळवाच्या पहिल्याच पावसात वीज मंडळाच्या या कारभाराचे वाभाडे निघाले. ‘एमएसईबी’च्या अधिकार्‍यांनी आता तरी आपल्या कारभारात तातडीने सुधारणा करावी. ट्रॉन्स्फॉर्मर, वीजजोडणी यासह सर्वच कामे तातडीने मार्गी लावा अन्यथा एकेकाकडे बघतोच, अशी इशारावजा तंबी खा. श्री छ. उदयनराजे भोसले यांनी ‘एमएसईबी’च्या अधिकार्‍यांना दिली. वीज मंडळाच्या सातारा जिल्ह्यातील कारभाराचे गुरुवारी रात्री वाभाडे निघाल्यानंतर दैनिक ‘पुढारी’ने जनता व शेतकर्‍यांच्या संतप्‍त भावना रोखठोकपणे मांडल्या. यासंदर्भात ‘वीज मंडळाच्या अब्रूचे धिंडवडे’ अशा आशयाचे विशेष पान ‘पुढारी’ने प्रसिद्ध करून जनतेतील उद्रेकाची भावना समोर आणली. ‘पुढारी’च्या या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली. खा. श्री छ. उदयनराजे भोसले यांनीही या वृत्ताची दखल घेत ‘एमएसईबी’च्या कारभारावर झोड उठवली. सातारा जिल्हा शासकीय विश्रामगृहावर खा. उदयनराजे भोसले यांनी महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, श्रीकांत आंबेकर व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एस.बी. साळी यांच्याकडून जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणचे विद्युत ट्रॉन्स्फॉर्मर बंद असल्यामुळे अनेक ठिकाणच्या शेती व पिण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे सांगून निदर्शनास आणून दिले. याबाबत ते म्हणाले, शेतकर्‍यांसह नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. बंद असलेल्या विद्युत ट्रॉन्स्फॉर्मरची कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. ज्या ठिकाणी नवीन विद्युत ट्रॉन्स्फॉर्मरची मागणी आहे त्या ठिकाणची कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सक्‍त सूचना खा. उदयनराजेंनी अधिकार्‍यांना केल्या.

सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक नळ-पाणीपुरवठा योजनांची वीज कनेक्शन विचारपूर्वक तोडण्यात यावीत. शेतीपंपासाठी नवीन विद्युत कनेक्शन जोडण्याची कामे त्वरित मार्गी लावावीत, अशा सूचना करत त्यांनी सर्व कामांचा अहवाल येत्या 4 ते 5 दिवसांत सादर करा नाही तर बघतोच, असेही सुनावले.

दरम्यान, जिल्हा परिषदेमधील प्रलंबित कामांचाही आढावा खा.उदयनराजे यांनी सर्किट हाऊस येथे घेतला. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता माझी नसली म्हणून काय झाले माझी कामे झालीच पाहिजेत अन्यथा बघावे लागेल, असा सज्जड दमही त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अन्य खातेप्रमुखांना दिला.

जिल्हा परिषदेमध्ये खासदार फंडातील कामांचे आराखडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत त्याला त्वरित परवानगी देऊन ती कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना खा. उदयनराजे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. परळी भागात खा. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. मात्र, पंचायत समितीमधील अधिकारी त्यांच्या झालेल्या कामावर फलक लावत नसल्याच्या तक्रारी काही पदाधिकार्‍यांनी केल्यानंतर उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना बैठकीतून बाहेर जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.

जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना तुम्हाला कामे करता येणार आहेत का? करता येत नसतील तर स्पष्ट सांगा मग पुढचे बघतो, असा इशारा खा. उदयनराजे यांनी दिला.

No comments

Powered by Blogger.