काँग्रेसचे अस्तित्व, राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला


ढेबेवाडी : राजकीयद‍ृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या ढेबेवाडी विभागातील मंद्रूळ कोळे आणि मंद्रूळ खुर्द या दोन्ही ग्रामपंचायतींमुळे काँग्रेसचे अस्तित्व तर राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शिवसेनेकडून मात्र सावध भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळेच शिवसेना मतदानावेळी कोणती भूमिका घेणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार नरेंद्र पाटील व त्यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांचे मंद्रूळ हे गाव. ढेबेवाडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि हिंदुराव पाटील यांनी यापूर्वी पाटण विधानसभा निवडणुकीसह पाटण पंचायत समिती निवडणुकीत अनेकदा ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली होती. तालुक्यात आ. शंभूराज देसाई आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गट प्रबळ असला तरी ढेबेवाडी विभागावर मात्र हिंदुराव पाटील गटाचेच वर्चस्व राहिले होते.

मात्र, गेल्या पाच वर्षांपासून हे चित्र बदलू लागले आहे. सद्य:स्थितीत मंद्रूळ कोळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची म्हणजेच आ. नरेंद्र पाटील गटाची सत्ता आहे. तर मंद्रूळ खुर्दवर हिंदुराव पाटील गटाची म्हणजेच काँग्रेसची सत्ता आहे. याशिवाय मागील वर्षी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत हिंदुराव पाटील गटाला आ. नरेंद्र पाटील गटाने पराभवाचा धक्‍का दिला होता. त्यामुळे ढेबेवाडी विभागात राष्ट्रवादीचे वाढते वर्चस्व मोडीत काढण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे.

मंद्रूळ कोळेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी मंद्रूळ खुर्दवर काँगे्रसची सत्ता आहे. ही सत्ता अबाधित ठेवत दोन्ही ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवत आपले अस्तित्व कायम ठेवण्याचेही आव्हान काँग्रेसला पेलावे लागणार आहे. तर आ. नरेंद्र पाटील गटाकडून दोन्ही ग्रामपंचायतींवर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करत आपली प्रतिष्ठा कायम राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीचे आ. नरेंद्र पाटील गटाने मंद्रूळ कोळे ग्रामपंचायतीवरील वर्चस्वाला सुरूंग लावला होता. मात्र, त्याचवेळी मंद्रूळ खुर्द ग्रामपंचायतीत मात्र त्यांना शिरकाव करता आला नव्हता. गेल्या 20 वर्षांपासूनचे वर्चस्व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून मोडीत काढले आहे. त्यामुळेच काँग्रेसपुढे अस्तित्व टिकवण्याचे तर राष्ट्रवादीपुढे प्रतिष्ठा कायम राखण्याचे आव्हान या निवडणुकीमुळे निर्माण झाले आहे.

या विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत होत आहे. शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ग्रामपंचायत निकालाचे दूरगामी परिणाम तालुक्याच्या राजकारणावर होणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही या निकालाचे परिणाम होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments

Powered by Blogger.