चिटणीसांचा वाडा म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना


मसूर : निगडी (ता.कराड) गावला फार पूर्वीपासून ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे श्रीमंत महादजी शिंदे यांच्या चिटणीसांचा वाडा आजही इतिहासाची साक्ष देत खंबीरपणे उभा आहे. त्याच्या इतिहासकालीन आठवणी आजच्या पिढीतील काही जाणकारांनी विषद केल्या आहेत. या वाड्याला सुमारे 350 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. हा वाडा म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असल्याचे जाणकार सांगतात.

अनेक पावसाळे, भूकंप, निसर्गाचे तडाखे झेलत हा इतिहासकालीन चिटणीसांचा वाडा व त्याचे बांधकाम भक्‍कम अवस्थेत असलेले आजही पहायला मिळते. काळाच्या ओघात व येथे कोणी वास्तव्यास नसल्याने आज या इतिहासाच्या साक्षीदाराची पडझड झाल्याचे चित्र आहे. वाड्यामध्ये जुन्या धाटणीचा आड आहे. त्यामध्ये आजही भरपूर पाणी आहे. तसेच आतमध्ये इतिहासकालीन भक्‍कम दारे, भुयारे, अंबारी याचा उत्तम नमुना आहे.

सध्या झाडाझुडपांच्या विळख्यांनी इतिहासाच्या या साक्षीदाराला सर्व बाजूंनी वेढले आहे. वास्तूची पडझड झाल्याने आतमध्ये कोणीही जात नाही. पण बाहेरून पाहिले या साक्षीदाराचा रूबाब पर्यटकांना आजही भुरळ पाडेल असाच आहे. पश्‍चिममुखी असलेल्या या वाड्याचे बांधकाम चिरेबंदी आहे. दरवाजा इतिहासकालीन आणि मजबूत आहे. त्याला पितळेच्या जुन्या कड्या व भवरे आहेत. इतिहासातील महादजी शिंदे घराण्याचे चिटणीस या वाड्यात राहत असत.

आता सध्या या चिटणीसांचे सर्व कुटुंबीय ग्वाल्हेर संस्थानात रहायला गेले आहेत. त्याचे सर्व रेकॉर्ड ग्वाल्हेरमध्येच असल्याचे समजते. दरम्यान, या इतिहासकालीन वास्तूची पाहणी करून पुरातत्व खात्याने अथवा संबंधितांनी त्याची डागडुजी केल्यास आणि त्यास पर्यटनाचा दर्जा दिल्यास इतिहासप्रेमींना ती एक पर्वणीच ठरणार आहे.

No comments

Powered by Blogger.