लग्नात नवरदेवाने दिली ग्रंथालयास नवरीच्या वजनाएवढी पुस्तके


आरडगांव : आज काल लग्न सोहळे हे अनेकांचे मान पान राखत मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. परंतु लग्नातून सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचावा म्हणुन काहीच मंडळी सामाजिक भावना जपत सामाजिक उपक्रमातुन आपले कार्य करीत असतात. मग जलयुक्त शिवारच्या कामाना भेट देणे तिथेच जोडीने श्रमदान करणे, वृक्षारोपण करणे. तसेच वेगळ्या पद्धतीने छापलेल्या लग्न पत्रीकेतूनच समाजापुढे एक आदर्श ठेवत विवाह सोहळा करणारी काही मंडळी हातावर बोटे मोजण्याइतकीच सापडत असतात. फलटण तालुक्यातील तरडगाव येथे ही एक आगळा वेगळा मंगल परिणय विवाह सोहळा संपन्न झाला.

यावेळी नवरदेवाने चक्क लग्नातच पुस्तकांची तुला घडवून आणली. नवरीच्या वजनाएवढी पुस्तके तरडगाव ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयाला भेट देण्याचा पुस्तक संकल्प नवरदेवांने केला होता काही महिन्यांपूर्वीच तरडगाव ग्रामपंचायतीने ग्रंथालय सुरु केले आहे , ग्रंथालयास पुस्तके भेट देण्याचे आवाहनही ग्रामपंचायतीमार्फत केले गेले होते. त्यानुसार हा पुस्तक भेट देण्याचा संकल्प उपसरपंच अमोल गायकवाड़ यांनी स्वताच्या लग्नातून सत्यात उतरविला आहे. यावेळी नवरीच्या वजना एवढी ४० किलो वजनाची पुस्तके ग्रंथालयास भेट देण्यात आली.तरडगाव येथील नवरदेव उपसरपंच अमोल गायकवाड़ आणि खराडेवाडी येथील नवरी आदिता मोहिते यांच्या ह्या सामाजिक उपक्रमानाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

गायकवाड़ आणि मोहिते कुटुंबिय यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून विशेष कौतुक केले जाते आहे. एक आदर्शवादी विवाह सोहळा संपन्न झाल्याचे समाधान तर आहेच शिवाय लोक ही अशा ग्रंथतुले सारख्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आल्याने स्वतचे भाग्यच समजत आहेत. महामानव, भारतीय संविधान, बहिष्कृत भारत , ज्ञानपीठ पुरस्कार , महात्मा फुले समग्र वाड्मय, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन खंड आदि पुस्तकांसह मराठी विश्वकोश, मराठी शब्दकोश ही विद्यार्थी यांना स्पर्धेच्या क्षेत्रात उतरण्यासाठी प्रवृत्त करणारी विविध स्पर्धेची पुस्तके ग्रंथ तुला करताना भेट देण्यात आली.तसेच लग्नपत्रिकांचा ही खर्च टाळण्यात आला होता .

 लग्नात आहेर हे ग्रंथ आणि पुस्तके स्वरुपात च स्वीकारले जातील असे प्रत्यक्ष भेटित, व्हॉटस अॅप, फेसबुक सारख्या सोशल मीडिया माध्यमांतून मेसेज करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी भेट वस्तू म्हणुन पुस्तकेच भेट देण्याची पसंती दर्शविली. लग्नास सत्कारां साठी अनावश्यक असलेला हार तुरे शाली यांचा खर्च टाळून मान्यवर यांना झाडे लावा झाडे जगविणेचा संदेश देत झाडांची रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद् Iअध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजीसमाजकल्याण सभापती आनंदराव शेळके (पाटील ) , लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि, सोमनाथ लांडे, महानंदा डेअरीचे ऊपाध्यक्ष मा.डी. के. पवार, फलटण पंचायत समितीच्या सभापती रेश्माताई भोसले , माजी सभापती वसंतराव गायकवाड़ , पंचायत समिती सदस्या विमलताई गायकवाड़, जि.प सदस्य दत्ता ( बापू ) अनपट , सरपंच विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादीचे युवा नेते सागर शेळके,पत्रकार, रमेश आढाव, सुरेश भोईटे, सचिन गायकवाड आदि मान्यवर लोकमंगल परिणय सोहळ्यास उपस्थित होते.

अलीकडच्या काळात वाचन संस्कृती ही खुपच मोठ्या प्रमाणात लोप पावत चालली आहे.त्यामुळे पुस्तकांशी लोकांनी मैत्री करावी.वाचा तर वाचाल अशी आज म्हणण्याची वेळ आली आहे, ग्रंथतुलेचा हा ऊपक्रम सर्वाना प्रेरणा देणारा आहे. सत्कारासाठी लग्नात श्रीफळ, पुष्पगुच्छ, शाल याला फाटा देऊन त्याऐवजी झाडाचे रोपटे देऊन केलेला सत्कार हा अतुलनिय ऊपक्रम आहे. झाडे भेट देऊन त्यांनी झाडे लावण्याचा व वाचविण्याचा एक संदेशचं दिला आहे. -फलटण पंचायत समिती सभापती सौ.रेश्माताई भोसले


 हा विवाह सोहळा समाजाला एक नवी दिशा देणारा ,कौतुकास्पद आणि प्रेरणा देणारा आहे. असे विवाह होणे काळाची गरजं आहे -सपोनि सोमनाथ लांडे लोणंद पोलीस स्टेशन

No comments

Powered by Blogger.