‘कर्मवीर छाया’ला अखेर न्याय


सातारा : रयत शिक्षण संस्थेचे बॅ. पी. जी. पाटील यांच्या मृत्युपत्राबाबत रकमेचा अपहार झाल्याप्रकरणी महिपती गणपती निकम (सध्या रा. गोळीबार मैदान, मूळ रा. कोल्हापूर) याला मुख्य न्यायदंडाधिकारी डी. बी. माने यांनी 6 महिने साधी कैद व 50 हजार रुपये दंड, तो न भरल्यास 2 महिने साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली. 2010 साली ही घटना समोर आल्यानंतर रयत परिवारामध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, बॅ. पी. जी. पाटील व सुमतीबाई पाटील यांनी मृत्युपत्राद्वारे मृत्यूनंतर सर्व संपत्ती दान केली आहे. सध्या ‘कर्मवीर छाया’ हे त्यांचे आठवणींचा ठेवा असलेले व कोल्हापूर विद्यापीठाला दान केलेले निवासस्थान सातार्‍यात आहे.याप्रकरणी 2010 साली बाळकृष्ण गोविंद शेवाळे (रा. गोडोली) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी, बॅ. पी. जी. पाटील यांनी मृत्युपत्र तयार केले होते. या मृत्युपत्राची एक संयुक्‍त समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार बाळकृष्ण शेवाळे हे सदस्य असून महिपती निकम हा सचिव होता.या समितीने सचिव महिपती निकम याच्याकडे अमागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेव पावती करण्यासाठी म्हणून 10 लाख रुपये तसेच समितीच्या इतर खर्चासाठी 50 हजार रुपये दिले होते. मात्र, निकम याने या रकमेचा खर्च न ठेवता त्याने स्वत:च्या नावावर रयत को-ऑपरेटिव्ह येथे ती रक्‍कम वर्ग केली. अशाप्रकारे दि. 3 डिसेंबर 2007 ते 13 नोव्हेंबर 2010 या कालावधीत रकमेचा अपहार केल्याने 2010 मध्येच त्याच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फौजदार राजेंद्र चौधरी यांनी तपास केला. जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पा जाधव यांनी काम पाहिले. एकूण 13 साक्षीदार याप्रकरणी तपासण्यात आले. दोन्ही पक्षाचा युक्‍तिवाद ऐकून न्यायाधिशांनी आरोपी महिपती निकम याला शिक्षा ठोठावली. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अविनाश पवार, वैभव पवार, विद्या कुंभार यांनी सहकार्य केले.

दरम्यान, 2010 मध्ये बॅ.पी.जी. पाटील व सुमतीबाई पाटील यांनी निधन होण्यापूर्वीच मृत्यूपत्र तयार केले होते. या दाम्पत्याने रयत शिक्षण संस्थेची अखंड आयुष्यभर व मृत्यू पश्‍चातही सेवा केली आहे. जीवन प्राधिकरण येथील पारसनीस कॉलनीमध्ये असणारा ‘कर्मवीर छाया’ हा बॅ.पी.जी. पाटील यांचा बंगला मृत्यू पश्‍चात कोल्हापूर विद्यापाठीला शिक्षणासाठी दान केला. तसेच दाम्पत्याने सोने, रोकड इतर स्थावर वाटून सर्वांना दिलेली आहे.

No comments

Powered by Blogger.