कोरेगावमध्ये विषमुक्त शेती तंत्रज्ञान व तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण


कोरेगाव : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालयामध्ये सोमवार दि. 14 मे रोजी सायंकाळी 6 वाजता बीव्हीजी फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विषमुक्त शेती तंत्रज्ञान, सरकारी योजनांची माहिती, आरोग्य, तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी याबाबतचे सखोल मार्गदर्शन व ‘विषमुक्त शेती व कॅन्सरमुक्त भारत’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले असल्याची माहिती बी.व्ही.जी. उद्योग समुहाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड व व्हा.चेअरमन उमेश माने यांनी दिली.भारत सरकारने हणमंतराव गायकवाड यांना नीती आयोगाबरोबर काम करण्याची संधी दिली असल्या मुळे अधिक व्यापक प्रमाणात काम करताना त्यांनी एकी हेच बळ या म्हणीला सार्थ ठरवीत सर्वांगीण विकासाचा विडा उचलला आहे. 

शेतकर्‍यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मातीतील 18 घटकांचे अत्यल्प दरात मातीपरीक्षण करणे, अत्यावश्यक पाणी परिक्षण, हवामानाची पूर्व सूचना देणारी सटेलाईट मॅपिंग यंत्रणा जिल्ह्यात राबविणे असे विविध उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात येणार आहेत. शेतीत प्रगत व विषमुक्त अत्याधुनिकता आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यामुळे पारंपारिक पध्दतीने होत असणारा शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करणे, विषमुक्त शेती करुन उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे, शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा बनणे, शासनाच्या विविध 110 योजनांची सविस्तर माहिती व लाभ यांची माहिती देणे, त्यांना मदत मिळवून देणे तसेच स्थानिक शेतकर्‍यांना इस्रायली तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या चर्चासत्रात शेतीपुरक खते व दुभती जनावरे यांच्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादित केलेल्या हर्बल उत्पादनांची सचित्र माहिती देण्यात येणार आहे.

सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यविषयक समस्यांच्या निवारणासाठी, विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन, तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देणे, शेतकर्‍यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे यासह विविध रोजगारांच्या संधींबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.