गुंड भाऊसाहेब पाटीलला अटक


इस्लामपूर : गेली तेरा वर्षे रेठरे धरण व परिसरात प्रचंड दहशत निर्माण केलेल्या गुंड भाऊसाहेब पाटील उर्फ भावशाच्या अटकेने अनेकांनी नि:श्‍वास सोडला आहे. आता तरी खंडागळे-पाटील घराण्यातील संघर्षाला पूर्णविराम मिळेल अशी आशा आहे..सन 2005 मध्ये रेठरेधरण येथील दादासाहेब खंडागळे यांनी भावशाला थप्पड मारली होती. या थपडीचा बदला घेण्याच्या इर्षेने भावशा पेटून उठला होता. गेल्या तेरा वषार्ंत या प्रकरणात दोघांचे बळी गेले अन् भावशा कुविख्यात गुंड बनला. आज भावशावर तीन खुनाचे, खुनाचे प्रयत्न असे 12 गुन्हे दाखल आहेत. तत्कालिन जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. रविंद्र शिसवे यांनी त्याच्या टोळीला मोकाही लावला होता.

भावशाची गुन्हेगारी कारकीर्द ...
सन 2005 मध्ये गुंड भावशा हा ओढ्याकडेला प्रातर्विधीसाठी गेला होता. त्यावेळी किरकोळ कारणावरून वाद झाला आणि दादासाहेब खंडागळे यांनी त्याला थप्पड मारली होती. त्याचा राग मनात धरून तो व त्याचा चुलता हिंदुराव यांनी संताजी खंडागळे यांना मारहाणही केली होती. त्यानंतर या दोन्ही कुटुंबात कलह सुरू झाला. काही दिवसांनी भावशाचे चुलते हिंदुराव बेपत्ता झाले. आजपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. हिंदुराव याचा दादासाहेब व संताजी खंडागळे यांनीच घातपात केल्याचा संशय भावशा घेत होता. तेंव्हापासून तो सुडाने पेटून उठला.

पहिला खुनी हल्ला...

गावातीलच मोहन रंगराव पाटील हे संताजीच्या घरी येत-जात. ‘तुम्ही संताजीच्या घरी जाऊ नका’ म्हणून भावशाने मोहन पाटील यांच्यावर रेठरेधरण येथील बसस्थानकावर दि.27 जानेवारी 2006रोजी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून तो फरारी होता. दरम्यानच्या काळात तो मोटारसायकल चोरी व इतर गुन्हे करीत राहिला.

धनाजी पाटील याचा खून...

आपल्याविरुद्धची केस मागे घ्या म्हणून तो मोहन पाटील यांच्या मागे लागला होता. परंतु ते दाद देत नव्हते. त्याने दि.14 जानेवारी 2010 ला त्यांचा मुलगा धनाजी याचा खून केला आणि प्रकाश पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. फरारी असताना भावशाने गुन्हेगारी वर्तुळात बस्तान बसविण्यास सुरूवात केली. त्याने या दरम्यान सुपार्‍या घेऊन काही गुन्हे केले असावेत, अशी शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत. विट्याचा कुविख्यात गुंड संजय कांबळे याचा खून सुपारी घेऊनच भाऊसाहेब व त्याच्या साथीदारांनी केल्याचा आरोप आहे.संजय कांबळे याच्या खूनप्रकरणी विशेष पथकाने 30 ऑगस्ट 2010 रोजी छत्तीसगड येथील रायगड रेल्वे स्थानकावर सापळा रचून त्याला अटक केली होती. त्यानंतर विटा पोलिसांकडून इस्लामपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. भावशा याच्यावर संजय कांबळे, संताजी खंडागळे, धनाजी पाटील यांचे खून, मोहन रंगराव पाटील यांच्यावरील खुनी हल्‍ला आणि सात सायकल चोरींचे गुन्हे नोंद आहेत.

No comments

Powered by Blogger.