सांगलीच्या वाळू माफियांचा म्हसवडमध्ये धुडगूस


सातारा : माण तालुक्यातील विरकरवाडी येथील चौकातून वरकुटे मलवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर धुळगावचे गावकामगार तलाठी यु.व्ही.परदेशी यांच्या अंगावर ट्रक घालून त्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावेळी वाळूचा ट्रक खड्यात गेल्‍याने त्‍यांचा जीव वाचला. सांगली जिल्ह्यातील शिरढोण (ता.कवठेमहांकाळ) येथील अमित अशोक कुंभार व सचिन कुंभार हे दोघाजनांसह अन्य साथीदारांची मदत घेवुन पळून जाण्यात ते यशस्वी झाले. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वाळू माफियांनी म्हसवडमध्ये धुडगूस घातल्याने सातारा महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, चार मे रोजी प्रांताधिकारी खटाव/माण यांच्या तोंडी व माणचे तहसिलदार यांच्या लेखी आदेशाने धुळगावचे तलाठी यु.व्ही.परदेशी,शिरगावचे तलाठी ए.बी.सुर्यवंशी, शिंदी बुद्रुक चे तलाठी एस.व्ही.बदडे हे माणगंगा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाहतूकीस आळा बसावा यासाठी खासगी मोटारसायकलने गस्त (पेट्रोलिंग) करत होते. या दरम्‍यान म्हसवड हद्दीतील माणगंगा पात्रात जठरे वस्तीजवळ लाल रंगाचा ट्रक (क्रमांक-एम.एच.10-ए.डब्ल्यू- 4089) मध्ये नदीपात्रातील वाळू चोरून भरतानाचे आढळून आले. त्यावेळी ट्रकजवळील चार ते पाच इसम बाभळीच्या झाडाआड लपून बसले. त्यांना बोलावले असता, अमित कुंभार व सचिन कुंभार हे ट्रकजवळ आले. त्यांचेकडे वाळू उत्खनन व वाळू वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता त्‍यांनी परवाना नसल्‍याचे सांगितले. 

यावर त्‍यांना ट्रक म्हसवड पोलीस ठाण्यास घेण्यास सांगण्यात आले. मंडलाधिकारी जगताप व तलाठी सुर्यवंशी ट्रकमध्ये बसले. परंतु,अमित कुंभार याने ट्रक म्हसवडकडे न नेता वरकुटे मलवडीच्या दिशेने नेला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना अमितने ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ट्रक खड्डयात गेल्याने पुढील अनर्थ टळला. ट्रकमधील मंडलाधिकारी जगताप यांना मुक्कामार लागला आहे. दरम्यान, ट्रकमधून उड्या मारुन अमित व सचिन हे दुसऱ्या चारचाकी गाडीतून पळून गेले. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात मंडलाधिकारी राजेंद्र मारूती जगताप (मुळ राहणार- विलासपूर,गोडोली,सातारा) यांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास धनंजय बर्गे करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.