छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज पुरस्काराने अरविंद मेहता सन्मानित


फलटण : निरपेक्ष, निस्वार्थी व निर्भिड पत्रकारितेची आज समाजाला गरज असून त्याद्वारे समाजहिताला प्राधान्य देणारे, खर्‍या अर्थाने समाज प्रबोधन करणारे लिखाणाची आवश्यकता नमूद करीत आज पत्रकारिता अर्थाजणाचे साधन मानणार्‍या लोकांमुळे वृत्तपत्राची विश्‍वासार्हता कमी होत असली तरी वृत्तपत्रांमध्ये काही चांगले आणि समाज प्रबोधन करणारे लिखाणही असते त्याच्याकडे समाजाने अधिक लक्ष द्यावे अशी अपेक्षा युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केली.

व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रच्या 19 व्या युवकांसाठी प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन किल्ले रायरेश्‍वर ता. भोर येेथे दि. 12 ते 15 मे दरम्यान करण्यात आले होते. या सोहळ्यात महाराष्ट्रातून सुमारे 700 हून अधिक युवक सहभागी झाले होते. या तरुणांना संस्काराचे धडे देण्याचे काम या शिबीरातून किर्तन, प्रवचन, व्याख्यान, चर्चासत्रे तसेच श्रमदानातून ऐतिहासिक स्थळावरील पाण्याचे साठे, विहिरी तळी, पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढून स्वच्छ करणे, बैलगाडीसाठी रस्ता तयार करणे आदी माध्यमातून झाले त्याचबरोबर समाजासमोर एक वेगळा आदर्शही या शिबीराद्वारे ठेवण्यात आला. शिबीरा दरम्यान सोमवार दि. 14 रोजी पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांना युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. छ. संभाजी महाराजांची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि 11 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षित पुरस्काराने डॉ. प्रतापराव कदम यांना संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि 5 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप होते. त्याशिवाय गणेश जगदाळे, तळमावले यांना व्यवसायरत्न, प्रविण चव्हाण बारामती यांना शिक्षकरत्न, प्रविण वाघ ओझर (मिग) यांना उद्योगरत्न, संभाजी कदम गोरेगाव यांना कृषीरत्न आणि संदिप टेंगले केडगाव यांना क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

समाजात घेण्यासारखे खूप असते मात्र चांगले तेच घ्यावे असे सांगून निस्वार्थी, निर्भीड, निरपेक्ष पत्रकारिता करणारे अरविंद मेहता यांच्या सारख्या पत्रकारांची आज गरज आहे. अचूक व सत्य लिहिणारे अरविंद मेहता यांच्यासारखे फार कमी पत्रकार माझ्या पाहण्यात आले आज त्यांच्या पत्रकारितेस 51 वर्षे पूर्ण होत असून संस्थेसाठी ते एक आधारस्तंभ आहेत, त्यांच्यासरखा चांगला मित्र मिळाला हे मी माझे भाग्य समजतो असे गौरवोद्गार यावेळी युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केले.

डॉ. प्रतापराव कदम हे स्वत:चा व्यवसाय सांभाळून समाजातील दुर्बल घटकांना करीत असलेली मदत निश्‍चितच वेगळ्या प्रकारची आणि खर्‍या अर्थाने अडचणीतील लोकांना मदतीचा हात देणारी असल्याचे नमूद करीत त्यांचेही संघटनेच्या कार्यातील योगदान मोठे आणि महत्त्वाचे असल्याचे युवक मित्र बंडातात्या कराडकर यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होवून गेल्यानंतरही शासनाने ब्रिटीशकालीन कारकुन निर्माण करणारी जॉन मेकॉले यांची शिक्षण पध्दती सुरु ठेवल्याने या देशात तरुणांना योग्य प्रकारचे शिक्षणापासून वंचित रहावे लागल्यानेच सदाचारी, सुसंस्कृत देशभक्त तरुण घडविणार्‍या व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना करुन गेली 17/18 वर्षे विविध संस्कार सोहळे, कार्यक्रम उपक्रमाद्वारे युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या यांनी मोजक्या स्वरुपात परंतू दूरदृष्टी ठेवुन काम केले त्यानंतर आता राष्ट्रबंधू राजीव दिक्षीत गुरुकुलाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या शिक्षणाचा पुढचा टप्पा सुरु केला आहे त्याद्वारे आगामी काळात या देशात खर्‍या अर्थाने सदाचारी, सुसंस्कृत आणि देशभक्त तरुणांची फळी उभी राहील त्यातून राष्ट्र निर्माणाचे कार्य निश्‍चित मार्गी लागेल असा विश्‍वास व्यक्त करीत अशा देशभक्त लोकांचा संपर्क आल्यानेच आदरणीय तात्यांच्या मार्गदर्शनाखाली खर्‍या अर्थाने काही शिकता येत असल्याबद्दल आपण समाधानी असून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने दिलेला पुरस्कार आपण कृतज्ञतापूर्वक स्विकारला आहे मात्र त्यापैकी 11 हजार रुपयांची रोख रक्कम आपण संस्थेला साभार परत करीत आहोत कारण या संस्थेचा संपर्क आल्यापासून संस्थेच्या कामासाठी अनेकांकडून देणगी स्वरुपात रक्कमा घेतल्या परंतू मी स्वत: एक रुपयाही या संस्थेला देवू शकलो नाही त्यामुळे त्यांच्या पुरस्काराची रक्कम स्विकारण्याचा अधिकार मला नसल्याचे अरविंद मेहता यांनी स्पष्टपणे नमूद केले.

यावेळी डॉ. प्रतापराव कदम, संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार यांचीही समयोचित भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात प्रमोदराव भापकर यांनी पत्रकारांचे दोन प्रकार असतात त्यापैकी दुसर्‍या प्रकारातील निर्भिड व निस्पृह पत्रकार म्हणुन आपला मेहता यांचा परिचय असून पत्रकारितेसारख्या वाळवंटात मेहता सारखी हिरवळ आभावानेच पहायला मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. कदम यांचे कार्यही अतुलनीय असून राष्ट्रबंधू राजीव दिक्षित यांना अभिप्रेत असलेले काम ते करीत असल्याचे प्रमोद भापकर यांनी निदर्शनास आणून दिले.

संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. मारुती शेळके यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी विस्ताराने विवेचन केले. दत्तात्रय सस्ते (सर) यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि शेवटी समारोप व आभार प्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष शहाजीराजे काळे यांनी केले.

या शिबीरात दररोज काकड आरती, प्रार्थना व सुर्यनमस्कार, सुलभ नित्योपासना, चर्चासत्र, व्याख्यान, विविध स्पर्धा, हरिपाठ आणि किर्तनसेवेेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये क्रांतीकारकांच्या स्वप्नातील भारत, गर्दीत माणसांच्या माणुस शोधतो मी या विषयावरील चर्चासत्रे झाली. सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे जीवन चरित्र युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सलग 5 दिवस कथन केले.

रायरेश्‍वर ते लालकिल्ला मराठ्यांची दौड या विषयावर प्रमोद भापकर यांचे, राष्ट्र उभारणीमध्ये व्यसनमुक्त युवकांची भूमिका याविषयारवर तानाजीराव पांडोळे यांचे देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते या विषयावर डॉ. प्रतापराव कदम यांची व्याख्याने झाली. तर जिंकावा संसार येणे नावे तरी शूर या ओवीवर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे किर्तन झाले.

शिबीरादरम्यान विशेष श्रमदान मोहिमेतून किल्ल्यावरील ग्रामस्थांना जाण्यायेण्यासाठी उपयुक्त असलेली बैलगाडी वाट या तरुणांनी दुरुस्त करुन दिली. तर पाण्याच्या टाक्या व साठवण तलावातील प्रचंड गाळ काढून पाण्याचे साठे मोकळे करुन दिले. निश्‍चितपणाने अवघ्या 300 लोकवस्तीच्या रायरेश्‍वर किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरणात या 700 हून अधिक तरुणांनी नवा जोश निर्माण करुन दिला.

No comments

Powered by Blogger.