Your Own Digital Platform

पाचवडेश्‍वर’विकासाकडे कानाडोळाच


कराड :  पुणे - बंगळूर महामार्गालगत आणि कराडपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर कृष्णाकाठी असलेल्या निसर्गरम्य ‘पाचवडेश्‍वर’च्या विकासाकडे गेल्या दशकभरात शासनाचे दुर्लक्षच झाले आहे. सुदैवाने आता वाठार, नारायणवाडी येथील काही दानशूर लोकांनी पुढाकार घेत काही कामे हाती घेतली आहेत. मात्र त्यानंतरही ‘पाचवडेश्‍वर’कडील शासनाच्या दुर्लक्षाला पूर्णविराम मिळून हा परिसर विकसीत केव्हा होणार? हा प्रश्‍न आजही कायम आहे.

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कराड तालुक्यातील आगाशिव डोंगरापासून हाकेच्या अंतरावर पाचवडेश्‍वर असून याठिकाणी प्राचीन शंभू महादेवाचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. मंदिरापासून 60 ते 70 मीटर अंतरावरूनच कृष्णा सांगली जिल्ह्याच्या दिशेने वाहते. पाच वडाची मोठी वृक्षे, निसर्गरम्य परिसर आणि शांत, मनाला आत्मिक समाधान देणारा परिसर असल्याने येथे एक पर्यटनस्थळ म्हणून सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे.

माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर यांनी स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत दोन दशकांपूर्वी म्हणजेच 1992 सालाच्या आसपास मंदिरालगतच सामाजिक सभागृह बांधले आहे. या सभागृहात आता अनेकदा विवाह सोहळेच होताना दिसतात. तर 2007 साली तत्कालीन पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांच्या हस्ते भक्त निवासाच्या कामाचा शुभारंभ झाला होता. आजही ही भक्त निवास सुस्थितीत आहेत. पण मंदिरासह परिसराच्या विकासाकडे शासनासह लोकप्रतिनिधींकडून झालेला कानाडोळा पाहून भक्त निवासात आजवर किती भक्तांनी मुक्काम केला आहे? हाही एक संशोधनाचाच विषय आहे. मंदिर परिसरात आता वाठार येथील एका व्यक्तीकडून स्वखर्चाने पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरातील अपूर्ण भिंतीचे कामही पूर्ण करण्यात येणार असून त्याबाबतच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. तर नारायणवाडी येथील एक व्यक्ती स्वखर्चाने मंदिरासाठी रंग देणार असून मुख्य मंदिरासमोरील हनुमान मंदिर परिसरात रंगरंगोटीचे कामही सुरू करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीसह मंदिराचे पुजारी म्हणजेच महाराजही या खर्चात वाटा उचलणार असल्याचे सांगितले जात आहे.

मंदिरापासून कृष्णा नदीकडे जाण्यासाठी एक सुंदर घाट बांधण्यात आला आहे. हा परिसरही विकसीत करण्यास बराच वाव आहे. मात्र शासनासह माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या प्रयत्नातून झालेले भक्त निवास आणि सभागृहाचे काम वगळता या परिसराचा म्हणावा तसा विकास झालेलाच नाही. काही दानशूर लोकांनी पुढाकार घेत परिसराचा विकास हाती घेतला असला तरी शासन आणखी किती दिवस ‘गांधारी’ची भूमिका घेत पाचवडेश्‍वरच्या विकासाकडे कानाडोळा करणार? हा अनुत्तरीत प्रश्‍न आजही कायम आहे.